सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली
सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते वर्षभरापूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण तात्काळ घटनास्थळाकडे गेले आहेत. मात्र, आता या पुतळ्याच्या उभारणीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन या पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते अशी माहिती दिली. तर, झालेली घटना दुर्दैवी असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आता, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही पुतळा प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या पुतळ्यावरुन आता राजकीय वातावरण तापलं असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी हा पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. तर, खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya sule) कॉन्ट्रॅक्टरसंदर्भात प्रश्न विचारला. शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी असल्याचं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
वाऱ्याचा स्पीड ताशी 45 किमी
विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नेव्हीने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केलं होतं. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,45 किमी पर अवर असा वारा होता, त्यात हे नुकसान झालं आहे. उद्या त्याठिकाण नेव्हीचे अधिकारी येणार आहेत. तात्काळ आमचे आणि नेहमीच अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्याचं काम आम्ही करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. तसेच, कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे म्हणत वैभव नाईक यांच्या तोडफोडीवर भाष्य केलंय.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच, 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आले होते. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच, पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. दरम्यान, वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडलं ही जनभावना आहे, पण त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, असेही रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.