(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेची फक्त 1100 मतं, भाजपची साथ मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना आमदाराचं वक्तव्य
आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल, आमचा कोण विचार करेल, अशा शब्दात सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
पंढरपूर : राज्यातील ठाकरे सरकारमध्ये (Maharashtra Thackeray Sarkar) शिवसेना आमदारही (Shiv Sena MLA) समाधानी नाहीत याची चर्चा अनेकवेळा समोर येते. याचंच एक उदाहरण पुन्हा समोर आलं आहे. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एका भाषणातून समोर आले. शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मते असूनही मी आमदार झालो असे सांगताना भाजपची खूप मदत झाल्याचे त्यांनी उघड केलं आहे.
पंढरपूर येथील डॉ बी पी रोंगे हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी भाजप खासदार रणजित निंबाळकर , भाजप आमदार समाधान अवताडे , माजी आमदार प्रशांत परिचारक या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले की, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर 24 तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे असे शहाजीबापू यांनी सांगितले. तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित शहाजीबापू यांनी उघड केले. मात्र निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडून गप लांब बसायचं, गडबड करायची नाही अशी तंबीही मिळाली होती. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले ठीक मात्र 30-30 वर्षे निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनाही डावलल्याची खंत शहाजीबापू यांनी व्यक्त केली. या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे, अशा शब्दात स्वतःच्याच पक्षाला टोले लगावले.
पाटील म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्याकडे कामापेक्षा जेवायला जाणे महत्वाचं वाटते. रोज बोकडं कापली जातात आणि आताही मला पुन्हा मला तिकडेच जेवायला जायचे आहे असे सांगत आता वजन कसे कमी व्हायचे अशी स्वतःवरच शेरेबाजी केली. सध्या माझे हात थरथरतात हे पाहून खासदार साहेबांनी सगळे टाकाटाकी कार्यक्रम बंद ठेवायला सांगितले आहेत. मात्र मी जेवायला नाही गेलो तर मतदार नाराज होतात असंही ते म्हणाले.