(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार
मी कृषीमंत्री असताना 72 हजार कोटींची ऐतिहासीक कर्जमाफी केली. याचा मला आनंद असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar : माझ्यावर कृषी खात्याची जबाबदारी आली तेव्हा 72 हजार कोटींची ऐतिहासीक कर्जमाफी केली. याचा मला आनंद असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचा दर हा 11 टक्क्यावरुन 3 टक्क्यावर आणला. आता काही ठिकाणी शून्य टक्क्यावर आहे. शेतकऱ्याला सन्मानाने जगता आले पाहिजे, हे सुत्र मी दिल्लीत मांडत होतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. स्वतंत्रसेनानी आणि माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी दिवंगत मुरलीधर अण्णा पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते जोपर्यंत होते, तोपर्यंत त्यांना शिक्षण, सहकार, संघटनेच्या कामात, माणसे जोडण्यात आनंद होता. त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांच्या कामाचे स्मरण करावे असेही पवार यावेळी म्हणाले. आज मी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही याची अस्वस्थता असल्याचे पवार म्हणाले. मुरलीधर अण्णा यांची सुरुवात सरपंच पदापासून झाली होती. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केले. कारखाना उभारणीत देखील त्यांचे मोठ योगदान होते. सतत जागृत राहणारे, सगळ्यांशी सुसंवाद असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. सुरुवातीला महाराष्ट्रात युवा टीम उभा केली, आमि महाराष्ट्राचे राजकारण बदलले, यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते असे पवार म्हणाले.
जळगाव जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा होता. गांधी नेहरुंचा विचार घराघरात होता. या जिल्ह्यात नेतृत्वाची मालिका होती. खिशातील हातरुमाल देखील खादीचा असायचा. गांधी नेहरुंचा विचार हे सुत्र या जिल्ह्यात होते. याकाळात मुरलीधर अण्णांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्याचे पवार यांनी सांगितले. जळगाव ते नागपूर काढलेल्या कापूस दिंडीची आठवण देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितली. त्यावेळी आम्ही कापसाला 500 रुपये दर देण्याची मागणी केली होती. त्यावेळी ए.आर. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळची कापूस दिंडी कशी निघाली. त्या दिंडीत मुरलीधर अण्णांचे योगदान कसे होते हे पवार यांनी सांगितले. तसेच त्यावेळी अटक करण्यात आल्याचा प्रसंग देखील पवार यांनी यावेळी सांगितला.
महत्वाच्या बातम्या: