संजय राऊतांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी; भरत गोगावलेंकडून राऊतांना अपशब्द
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली जातेय. यावरुन अधिवेशनात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब.
Sanjay Raut on Shivsena and BJP : विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे.
संजय राऊतांनी चोरमंडळ उल्लेख केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला अनुमोदन देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनीही त्यांना अपशब्द वापरला. राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंना सुनावले. या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ... विधीमंडळ नाही 'चोर'मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे."
हा महाराष्ट्रद्रोह...; आशिष शेलारांची राऊतांवर टीका
"संजय राऊत यांचं नैराश्य समजू शकतो. एक हिंदी सिनेमाचं गाणं आहे, चोरों को सभी नजर आते है चोर, हा विधानसभेचा, सगळ्या सदस्यांचा अपमान. हा महाराष्ट्रद्रोह आहे," अशा शब्दात आशिष शेलारांनी संजय राऊतांवर टीका केली.
आशिष शेलारांच्या मताशी सहमत, पण... : विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात सभागृहात बोलताना आशिष शेलार यांच्या मताशी सहमत असल्याचं बोलले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "कुठल्याही नेत्याला आणि व्यक्तीला विधीमंडळाबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त आणि नियम पाळायला हवं. मात्र राऊत असं खरचं बोललेत का? याचा तपास व्हायला हवा, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.