Raj Thackeray: लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान
Raj Thackeray: योजना लोकप्रिय होत असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर, ही योजना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या विदर्भ दौरा सुरू असून आज त्यांनी नागपूरमधून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना आगामी विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुकीती विजय-पराजय, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, बदलापूर प्रकरण आणि जातीय तणाव यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येतं नाही. मात्र आगामी काळात त्यांच्यात तिकीट वाटपावरून इतक्या हाणामाऱ्या होतील की पक्ष बेजार होतील. एक झलक आपण लोकसभेच्या वेळी बघितली. प्रत्येकालाच निवडणुकीसाठी उभं राहायचं असल्याचे चित्र सध्या त्यांच्याकडे दिसत आहे. त्यामुळे, मनसे विधानसभेला 200 ते 225 जागा लढवणार असल्याची घोषणाच राज ठाकरेंनी केली. तर, लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज ठाकरेंनी गंभीर विधान केलं आहे.
राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin yojana) जोरदार प्रचार आणि प्रसार सुरू आहे. विशेष म्हणजे ही योजना लोकप्रिय होत असल्याचे पाहून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर, ही योजना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, लाडक्या बहिणींनो तुम्ही महायुतीला आशीर्वाद द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरळीत सुरू राहिल, असा शब्दही राज्यकर्त्यांकडून दिला जात आहे. विशेष म्हणजे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ह्या योजनेच्या रकमेत हळू हळू वाढ होऊ ती रक्कम 3 हजार रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे. तर, या योजनेसाठी राज्य सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अनेकदा भाषणातून सांगितलं आहे. मात्र, आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लाडकी बहीण योजनेबाबत गंभीर विधान केलं आहे.
''लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि 24 तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही, कारण राज्याकडे पैसेच नाहीत.'', अशा शब्दात राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत गंभीर विधान केलं आहे. त्यामुळे, राज ठाकरेंच्या विधानावर आता राज्य सरकारकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल, हे पाहावे लागेल. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यातील 1 कोटी 7 लाख पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत.
दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका
दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाअधिक जागा आम्ही लढणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार, असेही राज यांनी मिश्कीलपणे स्पष्ट केले.
हेही वाचा
दोनच दिवसांपूर्वी पोलीस भरतीची परीक्षा दिली; प्रेमप्रकरणातून युवकाने उचललं टोकाचं पाऊल