(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापुरात शाळांना सुट्टी; पण मुख्याध्यापक; शिक्षकांनी हजेरी लावायची
पुण्यात तब्बल 32 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे
पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजली जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात व जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे (Rain) सकाळपासूनच पुण्यातील विविध भागांत पाणी साचलं होत, तर काही भागांतील घरांमध्ये नागरिक अडकले होते. या भागात एनडीआरएफ व अग्निशमनच्या जवानांनी धाव घेत नागरिकांना घरातून बाहेर काढले. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या डोळ्यातही पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. कारण, अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून मोठं नुकसानही झालं आहे. पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला, त्याच पार्श्वभूमीवर आज शाळांना (School) सुट्टी देण्यात आली होती. आता, उद्या 26 जुलै रोजीही पावसाची शक्यता लक्षात घेत पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागणार आहे.
पुण्यात तब्बल 32 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.ज्याअर्थी, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 जुलै 26 जुलै 2024 रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 26 जुलै 2024 रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडीमधील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली ाहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचंही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी म्हटलं आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तसेच उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात शाळांना 2 दिवस सुट्टी
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच, पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश दिले. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याचे आदेशात म्हटले आहे.
सांगलीत शाळांना सुट्टी
सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने तसेच वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा नदीला पूर आल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये हजर राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत.
ठाणे जिल्ह्यातही शाळांना सुट्टी
ठाणे जिल्हा, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळा आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ओसांडून वाहत आहेत, प्रशासन प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे अशावेळी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उद्या देखील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे.