(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुम्ही खोटं बोलता, आता बॅकफूटवरील संजय राऊत फ्रंटफूटवर, आंबेडकरांच्या टीकेला उत्तर!
Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : महाविकास आघाडीत संजय राऊत विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा नवीन संघर्ष पाहायला मिळत आहे.
Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा तिढा कायम असून, यावरूनच आता संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) असा नवीन संघर्ष पाहायला मिळत आहे. कारण प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत राऊत माध्यमांना खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या याच आरोपाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मी काय खोटं बोललो हे आंबेडकरांनी सांगावं' असे राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'जागा वाटपाला वंचित कारणीभूत नाही. 10 जागेवरून मतभेद सुरू आहे. त्यात पाच जागा अशा आहेत ज्यावर तीनही पक्षात एकमत होत नाही. पाचही जागा अशा आहेत ज्यावर एकाचवेळी तीनही पक्षाकडून दावा केला जात आहे. असे असतांना संजय राऊत माध्यमांना खोटं बोलत आहेत. त्यांचे भांडण संपत नाही, आधी तुमचं मिटवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
संजय राऊतांचे प्रत्युत्तर....
संजय राऊत खोटं बोलत असल्याचं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. जागा वाटपाची चर्चा अथवा महविकास आघाडीच्या चर्चा समाज माध्यमांवर होत नाही. आमच्यामधील कोणतीही चर्चा आम्ही समाज माध्यमांवर व्यक्त करत नाही. मी काय खोटं बोललो हे आंबेडकरांनी सांगावं. आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
एकही जागा मागितली नाही, असं संजय राऊत खोटं बोलतायत
महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होत नाही यासाठी सर्वात मोठी अडचण वंचित बहुजन आघाडी नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात दहा जागेवरून मतभेद आहेत. या दहा जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा केला जातोय, तर दुसरीकडे याच दहा जागांवर काँग्रेसकडून देखील दावा केला जातोय. याबाबत त्यांच्या अनेक बैठका झाल्या. मात्र, दोघेही एकमेकांना जागा सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे पाच जागा अशा आहेत ज्यावरून तिन्ही पक्षांमध्ये शेअरिंग होत नाही. पाची जागावर तीनही पक्ष दावा करत आहे. एकही जण त्या जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे त्यांचा समझोता होत नाही. असे असतांना वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे एकही जागा मागितली नाही, असं संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल...
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असून, काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :