Sushma andhare : मग हा कसला मोदींचा परिवार? रामदास तडस यांच्या सूनेच्या गंभीर आरोपांवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
रामदास तडस यांनी थोडं भान ठेवून बोलावं. असे आरोप होत असतात असे ते म्हणाले. मात्र, बाळ जन्माला यायला नऊ महिने लागतात, बटन दाबलं आणि बाळ जन्माला आलं असं होत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी सुनावले.
वर्धा : वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप करताना थेट पीएम मोदींकडे याचना केली आहे. मुलाचा डीएनए टेस्ट करण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुद्धा पूजा तडस यांनी केला. पूजा तडस यांनी वर्ध्यामध्ये अपक्ष अर्ज भरला असून त्या रामदास तडस यांच्याविरोधात रिंगणात आहेत.
मग हा कसला मोदींचा परिवार?
पूजा तडस यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सुषमा अंधारे यांनी पीएम मोदींना हा कसला मोदींचा परिवार? अशी विचारणा केली आहे. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूजा यांच्याशी खासदार रामदास तडस यांच्या मुलाने कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केले हे सर्वांना माहिती आहे. लग्नानंतर तिला ज्या फ्लॅटवर ठेवले गेले तो फ्लॅटही विकल्याने रस्त्यावर यावं लागलं. आज मुलाचा सांभाळ करायलाही तिच्याकडे आर्थिक तरतूद नाही. मोदीचा परिवार असं भाजप नेते दावा करतात, मग हा कसला मोदीचा परिवार? अशी विचारणा त्यांनी केली. रामदास तडस यांनी थोडं भान ठेवून बोलावं. निवडणुकीचे काळात अशी आरोप होत असतात असे ते म्हणाले. मात्र, बाळ जन्माला यायला नऊ महिने लागतात, बटन दाबलं आणि बाळ जन्माला आलंअसं होत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी सुनावले.
अशा अनेक कहाण्या रोज बाहेर येऊ शकतात
अंधारे म्हणाल्या की, भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या अशा अनेक कहाण्या रोज बाहेर येऊ शकतात. मोदींना माझी विनंती आहे की, तुम्ही प्रभू श्रीरामाचे नाव घेता तर त्यांचा एक वचनी एक पत्नी बाणा स्वीकारा. मोदींनी एक वचनी एक पत्नी संस्कार पक्षात तरी शिकवले तरी अनेक माय माऊलींचे जीवन वाचतील.
त्यांनी सांगितले की, पूजा तडस यांच्या संवेदना समजूनच मी इथं आली आहे. हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन उचलत आहे. एक परिवार उद्ध्वस्त होत असून तो परिवार मोदींच्या परिवारातील परिवार आहे. म्हणून मोदी 20 तारखेला त्याच उमेदवाराच्या प्रचाराला येत असतील, तर त्यांनी आधी त्या उमेदवाराचा परिवार सुरक्षित आहे का? हे पाहायला पाहिजे, मग भाषणबाजी केली पाहिजे, असा टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या