Nilesh Lanke : गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
Nilesh Lanke Meet Gaja Marne : नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतली आणि त्याच्या हस्ते सत्कारही करून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे : गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर निलेश लंके (Nilesh Lanke Meet Gaja Marne) यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट त्यांना अडचणीची ठरल्याचं दिसून येतंय. खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. यामुळे यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले निलेश लंके?
गजा मारणेच्या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले की, गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात होता. मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती. अमोल मिटकरी यांना मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवले असल्याने काहीही बोलतात.
अमोल मिटकरींचा आरोप काय?
शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी केलाय. गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का? असा सवालही यावेळी मिटकरींनी केलाय. पार्थ पवारांनी मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणीसारखी लंकेंचीही कानउघडणी पवार गट करणार का?, असा सवाल त्यांनी केलाय.
पार्थ पवारांच्या भेटीनंतर टीका
या आधी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.
कोण आहे गजा मारणे? (Who Is Gaja Marne)
अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गुंड गजा मारणेला अटक झाली होती. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
ही बातमी वाचा: