MVA Meeting on Loksabha Election : जिथं रामदास आठवलेंची लढण्याची इच्छा, तिथंच महाविकास आघाडीकडून सीपीआयचा सुद्धा दावा; काय निर्णय झाला?
MVA Meeting on Loksabha Election : महाराष्ट्रामध्ये सीपीआयकडून दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये परभणी आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
मुंबई : ममता बॅनर्जी आणि आपकडून इंडिया आघाडीला बसलेल्या दोन धक्क्यानंतर राज्यात आज (25 जानेवारी) महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (MVA Meeting on Loksabha Election) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणाऱ्या पक्षांसोबत चर्चा करण्यात आली. याच बैठकीतूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी पत्र देण्यात आले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पत्र स्वीकारताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्लाबोल केला आहे.
सीपीआयकडून दोन जागांवर दावा
आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्या पत्रावरील सहीवर आक्षेप घेत एक प्रकारे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. दुसरीकडे, बैठकीसाठी सीपीआयला सुद्धा महाविकास आघाडीकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सीपीआयकडून दोन जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये शिर्डी आणि परभणी या दोन जागांचा समावेश आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्रच राहू
या दोन जागांवरती बैठक बैठकीत आम्ही चर्चा केल्याचे सीपीआय नेते सुभाष लांडे यांनी सांगितले. कोणतीही एक जागा आली तरी आम्ही इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्रच राहू अशी भूमिका यावेळी सीपीआयकडून मांडण्यात आली. त्याचबरोबर इंडिया आघाडीची स्वतंत्र बैठक झाली पाहिजे, अशी देखील आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. इंडिया आघाडी म्हणून आपण निवडणुकाला सामोरे जाऊ, अशी आमची इच्छा आहे. इतर पक्षांना देखील बोलावलं होतं, त्यांची बैठक सुरू आहे. आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सीपीआयकडून दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये परभणी आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने या जागा मिळतात का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. महाविकास आघाडीकडून याबाबत कोणतेही आश्वासन सीपीआयला देण्यात आलेलं नाही. यापूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सीपीआयकडून निवडणूक लढवली गेली आहे.
रामदास आठवले सुद्धा शिर्डीतून इच्छूक
दुसरीकडे याच मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप पुरस्कृत एनडीएकडे महाराष्ट्रातून दोन जागांची मागणी यापूर्वीच केली आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. याच मतदारसंघातून रामदास आठवले लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा आता महाविकास आघाडीकडून आणि भाजपकडून कोणाला सुटते? याकडे आता लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या