(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC : सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर, सुधाकर कोरे आणि राहुल मातकर यांची बाजी
MPSC Result : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई: सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये मंत्रालयीन विभागातून सुधाकर कोरे यांनी तर लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून राहुल मातकर यांनी बाजी मारली आहे. शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 93 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये मंत्रालयीन विभागातील 83 तर लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील 10 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचाच आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021- अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/Xy78JrWjPq. https://t.co/p3RR5Lycst pic.twitter.com/vHEABSPeLx
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2022
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची गुणांची पडताळणी करायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहेत.
यूपीएससीचा निकाल जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. या परीक्षेत श्रुती शर्माने (Shruti Sharma) अव्वल स्थान पटकावलं आहे. श्रुती शर्मा ही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आरसीएची विद्यार्थिनी आहे. यंदा जामियाच्या आरसीएमधून एकूल 23 उमेदवारांनी यश मिळवलं.
यावर्षी 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 40 हून अधिक उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने 451 वा आणि अश्विन गोळपकरने 626 वा क्रमांक पटकावला आहे.