Monsoon Update : केरळमध्ये मान्सून 7 दिवस उशिराने, महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल झाला असून आता राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Weather Forecast : मान्सून अखेर केरळमध्ये दाखल (Monsoon Update in Kerala) झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Rain Update) कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही पावसासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वजण उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात पावसाच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.
केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल
देशात यंदा मान्सून एक आठवडा उशिराने दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे. हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पाऊस लांबला
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये पोहोचल्यानंतर गुरुवारपासून (8 जून) हवामानतज्ज्ञ मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं असताना दुसरीकडे देशात मान्सून पोहोचला आहे. मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात हजेरी लावतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे.
हवामान विभागाने वर्तवला अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल."
राज्यात पाऊस कधी येणार?
साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या पाऊस 8 जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर 18 जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.
बिपरजॉय चक्रीवादळ 48 तासांत तीव्र होणार
हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या मते, बिपरजॉय (Biparjoy) चक्रीवादळ पुढील 48 तासांत (10 जून) तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल. तसेच पुढील तीन दिवसांत ते उत्तर भारताकडे सरकणार आहे. स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.