Marathwada Crime News : मराठवाड्यात गावठी कट्टे येतायत कुठून, एकामागून एक गोळीबाराच्या घटना; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
Marathwada Crime News : औरंगाबाद शहरात मागील 15 दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत.
Marathwada Crime News : बाप आपल्याऐवजी तिसऱ्या पत्नीच्या मुलाला निवृत्त झाल्यानंतर नोकरी देतो, म्हणून पहिल्या पत्नीच्या मुलानेच वडिलांवर गोळीबार (Firing) केल्याची घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली. हिंगोलीमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला. बीड, नांदेड या जिल्ह्यातही गोळीबाराच्या अनेक घटना घडतायत. विशेष म्हणजे या सर्व गोळीबाराच्या घटनेतील साम्य म्हणजे गावठी कट्टा ठरतोय. त्यामुळे मराठवाड्यात (Marathwada) गावठी कट्टे येतात कुठून असा प्रश्न आता विचारला जात आहे.
औरंगाबाद शहरात मागील 15 दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. हिंगोलीत भाजपच्या जिल्हाध्यक्षावरच गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेने हिंगोली शहर हादरलं आहे. तर मागील काही दिवसांत नांदेड आणि बीडमध्येही गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व घटनांमध्ये गोळीबार हा गावठी कट्ट्यातून करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात हे गावठी कट्टे येतात कुठून असा प्रश्न विचारला जात आहे. तर हे गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याने अशा घटना वाढत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत सर्च ऑपरेशन राबवले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशच्या खडावा, खरगोन जिल्हाच्या जंगलात गावठी कट्टा तयार केले जातात. या जिल्हातून शिरपूर हे केवळ 40 किलोमीटर आहे. त्यामुळे ट्रकने प्रवास करत कट्टे मराठवाड्यात येतात. शिवाय काही गुन्हेगार रेल्वेने प्रवास करत कट्टे मराठवाड्यात पोहचवतात. या गावठी कट्याची किंमत 8 ते 10 हजार रुपये असते. त्यामुळे दहशत निर्माण करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांची खरेदी करतात. जमिनी बळकावणाऱ्या गँग, वाळू माफिया, अनेक गुंडांचे अनुकरण करणाऱ्या टोळ्याही कट्टे खरेदी करतायत. त्यामुळे अशा गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.
महिनाभरातील तीन घटना
- 25 जुलै रोजी वाळूज एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडल्या.
- 31 जुलै रोजी न्यू हनुमाननगर भागात सेवानिवृत्त स्वच्छता कर्मचाऱ्यावर दोन अज्ञातांनी घरात शिरून गोळीबार केला होता.
- 11 ऑगस्ट रोजी रात्री घाटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर प्रेयसीच्या मागे पिस्तूल घेऊन एक गुंड धावत होता. पोलिस व नागरिकांच्या मदतीमुळे तरुणीचे प्राण वाचले.
- नांदेड जिल्ह्यात 7 महिन्यात 9 गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत.
- हिंगोलीमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला
विक्री करतांना सांकेतिक भाषा वापरले जाते...
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे पोलीस कट्टा तयार करणाऱ्या लोकांवर जंगलात जाऊन कारवाई करतात. मात्र त्यांना कट्टे मिळत नाही. शिवाय सांकेतिक भाषा वापरून विकणारा आणि घेणारा याची ओळख पटू नये म्हणून त्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे गावठी कट्टा विकणाऱ्यांचे रॅकेट उध्वस्त करता येत नाही. त्यामुळे पोलिसांना आता आपली पद्धत बदलून, या आरोपींची पद्धत समजून घेण्याची गरज असल्याचं अभ्यासक म्हणतात.
इतर महत्वाच्या बातम्या: