(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! कुणबी प्रमाणपत्राबाबत आज अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता; मराठा समाजाला दिलासा मिळणार?
Kunbi Record : या नवीन अध्यादेशानंतर कुणबी नोंदी सापडलेल्या 52 लाख मराठा बांधवांसोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सग्यासोयऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.
जालना : राज्यभरात सापडलेल्या जुन्या कुणबी नोंदीवरून (Kunbi Record) त्यांची वंशावळ ठरविण्यासाठी आणि त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत अंतिम अध्यादेश आज (18 जानेवारी) रोजी निघण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून सरकार आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात यावरून महत्वाची चर्चा सुरु होती. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या मध्यस्थीनंतर सरकारच्या मसुद्यात जरांगे यांनी काही बदल सुचवले होते आणि ते बदल करण्यास सरकार तयार आहे. त्यामुळे याबाबत आज अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या नवीन अध्यादेशानंतर कुणबी नोंदी सापडलेल्या 52 लाख मराठा बांधवांसोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सग्यासोयऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून सरकारच शिष्टमंडळ आणि प्रशासन सतत जरांगे यांच्या संपर्कात आहेत. तर, माजी मंत्री बच्चू कडू हे देखील जरांगे यांच्या भेटीला गेल्याचे पाहायला मिळाले. कुणबी नोंदीवरून त्यांची वंशावळ ठरविण्यासाठी सरकार आणि जरांगे यांच्यात झालेल्या चर्चेत सगेसोयरे यांना देखील लाभ देण्याचे ठरले होते. मात्र, सगेसोयरे याची व्याख्या काय यावरून जरांगे आणि सरकार यांच्यात एकमत होत नव्हते. यासाठी सरकराने काही पर्याय जरांगे यांना दिले होते, मात्र, जरांगे यांना ते मान्य नव्हते. त्यानंतर जरांगे यांनी काही बदल सुचवले होते. आता यावर एकमत झाले असल्याची माहिती मिळत असून, जरांगे यांच्या परवानगीने आज कुणबी नोंदीवरून त्यांची वंशावळ ठरविण्याबाबतचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे.
मुंबई आंदोलनाबाबत आज आढावा बैठक...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असून, यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी निघणार आहे. दरम्यान, याच मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सोबतच, आज सकाळी मुंबई आंदोलनासाठी तयार करण्यात आलेले ट्रॅक्टर आणि एक ट्रक आंतरवालीमध्ये आणण्यात येणार आहे.
पोलीस अलर्ट...
मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली असून, यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वच जिल्ह्यातील मराठा आंदोलक सहभागी होणार आहे. त्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. कोणत्या गावातून किती आंदोलक जाणार, कोणते वाहनं घेऊन जाणार, यासाठी आर्थिक पुरवठा कुठून केला जाणार याची माहिती पोलिसांकडून जमा केली जात आहे. सोबतच, ज्या मार्गाने ही दिंडी जाणार आहे, त्या भागातील पोलिसांकडून देखील आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सगेसोयरे शब्दाबाबतचा 'मसुदा' एबीपी माझाच्या हाती; पाहा संपूर्ण मुद्दे...