Sharad Pawar: CM शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल; चर्चांना उधाण
Sharad Pawar meet CM Eknath Shinde: शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असताना शरद पवार वर्षावर दाखल झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज शरद पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, शरद पवार यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर प्रश्नांसाठी भेट घेतली असावी असे म्हटले जात आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची चर्चा का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू होण्यामागे मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने ही चर्चा सुरू झाली आहे.
या मुद्यांवरून चर्चांना उधाण
महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून जागा वाटपाच्या मुद्यावर मतभेद समोर आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांना ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
भाजपसोबतच्या युतीत शिवसेना शिंदे गटाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची चर्चा आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी तसे सूचक वक्तव्य केले होते.
भाजपकडून शिंदे गटाच्या खासदार, आमदारांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.