(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय शिरसाटांकडून 'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदेंना इशारा?
काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) केलं. ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं.
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) केलं. ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे.
ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाट यांनी म्हटलं की, आम्ही आजही शिवसेना आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नव्हती. आमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर तटस्थ राहिलो ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले.
मंत्रिपदासाठी दबाव आणताय का असं विचारलं असता शिरसाट म्हणाले की, माझा स्वभाव तसा नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही. मंत्रिपदासाठी मी भूकेलेला नाही. ज्या ठिकाणी चुकतं त्यावेळी बोलायला हवं. मला जे योग्य वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधीच येणार नाही, असंही शिरसाट म्हणाले.
शिरसाट म्हणाले की, मातोश्रीवर परत बोलावलं तर परत जायचं की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील. शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असू, असं शिरसाट म्हणाले. जर तुम्ही कुटुंबप्रमुखांची भूमिका बजावत असाल तर त्यावेळी कुटुंबाचं मतही जाणलं पाहिजे. ते कुटुंबप्रमुख राहिले असते, त्यांना आम्ही मानतही आलो आहोत.
मंत्रिपद हुकल्यावर संजय शिरसाट काल पहिल्यांदा औरंगाबादमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मला मंत्रीपद मिळेल विस्तार पूर्ण अजून झालेला नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. तुमचं नाव यादीतून कोणी कापलं असं विचारल्यावर मिश्किलपणे उत्तर देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याही वेळेस यादीतून माझं नाव कापलं आणि याही वेळेस कापले. मात्र निश्चितपणे पुढे मला मंत्रीपद मिळेल असं म्हणत एकनाथ शिंदेंवर मला विश्वास आहे असं संजय शिरसाट यांनी काल म्हटलं होतं.