Maharashtra News: 2024 नंतर एक होते शिंदे अशी स्टोरी लिहिली जाईल, शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढेंची टीका
Maharashtra News: गुण नाही पण वाण लागला आणि ढवळ्या बाजूला पवळ्या बांधला अशी शिंदे फडणवीस सरकारची केंद्रासोबत दोस्ती आहे, असे म्हणत अतुल लोंढे यांनी जाहिरातीवर टीका केली आहे.
मुंबई : आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे असं या जाहिरातीचं ब्रीदवाक्य आहे. दरम्यान शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढेंनी टीका केली आहे. 2024 नंतर एक होते शिंदे अशी स्टोरी लिहिली जाईल असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं आहे.
अतुल लोंढे म्हणाले, गुण नाही पण वाण लागला आणि ढवळ्या बाजूला पवळ्या बांधला अशी शिंदे फडणवीस सरकारची केंद्रासोबत दोस्ती आहे. भारत जोडो यात्रेनंतर पस्तीस टक्के लोक मानतात की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर आवाहन उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार येत्या निवडणुकीत केवळ पाच टक्के मतं ही शिंदे सेनेला मिळणार असे म्हटले आहे. एकच नाही तर असे अनेक सर्वे आले. शिंदे सरकारडून अशा पद्धतीचे सर्वे मांडून खोटा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत 42 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकतील. 2024 नंतर एक होते शिंदे ही स्टोरी महाराष्ट्रात लिहिली जाणार आहे.
काय आहे जाहिरात?
राज्याच्या राजकारणात 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत, असा दावा नुकताच एका सर्वेमधून करण्यात आला. याच सर्वेमध्ये फडणवीसांना पसंती देणाऱ्यांची संख्या 23.02 टक्के होती. म्हणजेच शिंदेंपेक्षा जवळपास तीन टक्क्यांनी कमी मतं होती. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच आजची जाहिरात देण्यात आली आहे का, असा सवाल आता विचारला जातोय.
राजकीय चर्चांना उधाण
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून मतदारसंघावर दावे केले जात आहेत. याचेच पडसाद भाजप-शिवसेना युतीत उमटताना पहायला मिळत आहेत, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजप युतीत काही अंशी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेनं जाहिरात दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :