(Source: Poll of Polls)
'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख
Maharashtra Politics : आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Politics : आतापर्यंत राज्याच्या राजकारणात 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय आहे जाहिरातमध्ये?
- राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
- अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार,
भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल
म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार,
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार...
राजकीय नेत्यांच्या प्रतिकिया...
दरम्यान यावर भाजप नेते अतुल भातळकर यांनी प्रतिकिया दिली असून, आमचे सरकार पुन्हा बहुमताने निवडून येणार असल्याचे या सर्व्हे मधून समोर आले आहेत. मात्र देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी जाहिरात आम्ही कधीच दिली नव्हती. तर जाहिरातमध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याचे भातळकर म्हणाले.
अंबादास दानवे यांची प्रतिकिया...
यावर प्रतिकिया देतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे थोडे दिवस राहतील. तर फडणवीस आणि शिंदे यांना दोघांना मिळून 49 टक्के पाठींबा मिळत असेल तर 51 टक्के विरोध असल्याचे या सर्व्हेमधून दिसून येत आहे. तर यापूर्वी असे सर्व्हे कोणेही वृत्तपत्रातून छापले नाहीत. मात्र आता असे सर्व्हे छापून पैश्यांची उधळपट्टी केली जात आहे. मात्र हा पैसा कोठून येत आहे असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Shiv Sena-BJP Alliance : ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा दावा; भाजप-शिवसेनेत पुन्हा तणाव