(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी तिसरी जागा भाजप लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक आहे. या तिसऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 42 मतांचा कोटा आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे.
भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.
या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण
शिवसेना : संजय राऊत
भाजप : पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे
राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल पटेल,
काँग्रेस : पी. चिदंबरम
संबंधित बातम्या :