(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik ACB : एसीबीची अनोखी शक्कल! महिला अधिकारी झाली शिक्षिका, धनगर मॅडमकडे काम आहे, म्हणत...
Nashik Crime : शेवटी मशीनच्या सहाय्याने 85 लाख रुपये मोजावे लागले, तर यात दोन हजाराची एकही नोट सापडली नाही.
Nashik ACB : नावातच धन असलेल्या नाशिकमधील (Nashik) लाचखोर महापालिका शिक्षण अधिकारी सुनिता धनगरांच्या (Sunita Dhangar) घरातून मोठं घबाड एसीबीच्या हाती लागलं आहे. या नोटा मोजतांना अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक उडाली होती. शेवटी मशीनच्या सहाय्याने त्यांना नोटा मोजाव्या लागल्या आणि सुदैवाने यात दोन हजाराची एकही नोट त्यांना सापडली नाही. दरम्यान या संपूर्ण कारवाईवेळी एसीबीने (ACB) एक अनोखी शक्कल देखील लढवल्याचे समोर आले.
एसीबीच्या एका कारवाईमुळे महाराष्ट्र शिक्षण विभागात (Maharashtra Education) सध्या एकच खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) लाचखोर शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्या उंटवाडी परिसरातील घरातून एसीबीच्या हाती मोठं घबाड लागलं असून एक दोन लाख नाही तर तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर दोन आलिशान फ्लॅट आणि एक जागा देखील आहे. त्या सध्या वास्तव्यास असलेल्या उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत जवळपास दिड कोटी रुपये एवढी आहे. 85 लाख रुपये मोजताना एसीबीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. अखेर मशीनच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली आणि यात सुदैवाने दोन हजाराची एकही नोट सापडली नाही.
दरम्यान या कारवाई संदर्भात एसीबी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर (Sharmitha Valavalkar) म्हणाल्या की, मध्यरात्री जवळपास 8 तास एसीबीचे पथक त्यांच्या घरात तळ ठोकून होते. सुरुवातीला एसीबी घर शोधत असतांना घर बंद असल्याने पथकाने घर सील केले आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय येताच घर उघडण्यात आले होते. धनगर यांचे बँक खाते, लॉकर्स किती? याबाबत सध्या तपास सुरू असून आणखी किती माया त्यांनी जमा केली आहे? याकडेच सगळ्यांचच लक्ष लागल आहे. सेवेत रुजू करून घेण्यास नकार देणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्याच्या मोबदल्यात बडतर्फ मुख्याध्यापकाकडून 50 हजारांची लाच घेतांना महापालिकेत शुक्रवारी सायंकाळी धनगरांना त्यांच्याच कॅबिनमधून रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एका लिपिकानेही तक्रारदाराला पत्र बनवून देण्यासाठी 5 हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले होते.
धनगर मॅडमकडे काम आहे...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार धनगर यांच्यावर पालिकेत लक्ष ठेवून असलेल्या एसीबीच्या पथकाबाबत कोणालाही संशय येऊ नये, म्हणून एसीबीने एक अनोखी शक्कल लढवली होती. 'धनगर मॅडमकडे काम आहे', असं सांगत पथकातील महिला अधिकारी तोंडावर रुमाल बांधून आणि सनकोट घालत चक्क शिक्षिका बनून केबिनबाहेर जवळपास एक तास बसल्या होत्या आणि काही वेळातच हा सापळा यशस्वी झाला होता.
पाच महिन्यात 76 सापळे, 112 जणांना अटक
चालूवर्षी कारवाईबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला असून गेल्या 5 महिन्यातच तब्बल 76 सापळ्यात 112 जणांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांनी 30 लाखांची लाच स्वीकारल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता आणि आता सुनीता धनगरांवर झालेली कारवाई यावर्षीची नाशिक विभागाची सर्वात मोठी कारवाई ठरण्याची शक्यता असून एसीबीच्या तपासाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलय..