Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Nagraj Manjule Movie : नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचं चित्र आहे. कारण या सिनेमासंदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स बजावण्यात आलंय.
Nagraj Manjule Movie : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव (Khashaba) यांच्यावरील चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. कारण मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याचप्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहेत.
खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन
नागराज मंजुळे यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट शेअर करत 'खाशाबा' सिनेमाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सिनेमाचं पोस्टर देखील शेअर केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
फँड्री,सैराट नंतर 'खाशाबा' हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय.
खाशाबा जाधव कोण आहेत? (Who Is Khashaba Jadhav)
खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसेच खेळाडूंवर बनविण्यात आले आहेत आणि ते बॉक्स ऑफिस वर यशस्वी ही होताना दिसतायत. आता मराठीतील पहिला असा भव्यदिव्य स्केलचा एका खेळाडूवर आधारित असा चित्रपट जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे.
View this post on Instagram