(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : सरकार पाडण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दुर्लक्ष करणं नडलं? शिंदे यांच्या बंडखोरीची पवारांनी दिली होती चार वेळा माहिती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या हालचालींबाबत स्वतः शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना चार वेळा माहिती देण्यात आली होती असं सुत्रांनी सांगितलं आहे.
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, एकनाथ शिंदे बंड करु शकतात याची तब्बल चार वेळा माहिती ही स्वत: शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गृहखात्याकडून चार ते पाच वेळा माहिती देऊनदेखील उद्धव ठाकरे यांच्याकडून हालचाल न झाल्याने, दुर्लक्ष केल्यानं सरकार पडलं.
एकनाथ शिंदे बंड करु शकतात अशी माहिती चार वेळा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच राज्याच्या गृह खात्यानेही या संबंधी चार-पाच वेळा इशारा दिला. पण त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं, त्यामुळे राज्यातील सरकार पडलं अशी माहिती सुत्रांनी दिली.
मविआ सरकारचे चुकले काय?
महाविकास आघाडीचे सरकार का गेलं याचं विश्लेषण डॉ. विनय काटे यांनी केलं आहे. ते म्हणतात की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी गलथानपणा दाखवत विधीमंडळाचे अध्यक्षपद हे रिक्त ठेवलं. ते खूप मोठे पद आहे, अगदी राज्यपालांच्या बरोबरीचे. उपाध्यक्षांवर अविश्वास व्यक्त करून बंडखोरांनी स्वतःच्या अपात्रतेची शक्यता शून्य करून टाकली.
बंडखोर आमदारांवर तडक कारवाई न करणे हे शिवसेनेच्या अंगलट आलं. 21 जूनला जेव्हा सकाळी हे स्पष्ट झाले की सेनेचे 25-30 आमदार सुरतला गेलेत त्याचवेळी एकही मिनिट न गमावता शिवसेनेने त्यांना आदल्या रात्री विधानपरिषद मतदानात क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त करून आणि पक्षविरोधी कारवाई म्हणून अपात्र करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करायला पाहिजे होती. तिन्ही पक्ष इथेही गाफील राहिले आणि त्यांच्याकडे 37 आमदार नाहीयेत, त्यामुळे सरकारला काही होणार नाही या गैरसमजात राहिले. प्रत्येक दिवशी नवीन बंडखोर वाढत गेले आणि आकडा 37 च्याही पलीकडे गेला जी आता सेनेसाठी मोठी कायदेशीर अडचण होणार आहे.
इंटेलिजन्स नाकामी ठरणे
डॉ. विनय काटे म्हणतात की, सरकारविरुद्ध एवढं मोठं षडयंत्र होत असताना इंटेलिजन्सच्या लोकांनी एकही मोठी सूचना सरकारला न देणे हे बरेच काही सांगून जाते. मविआ सत्तेत आल्यावर IAS, IPS अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या होणे अपेक्षित होते, जे अजिबात झाले नाही. फडणवीसांच्या जवळ असणारे अधिकारी आहे तसे भाजपधार्जिणे काम करत राहिले आणि त्यात मविआ सरकारचा घात झाला. Pegasus आणि मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाला खूप हलक्यात घेतले गेले आणि परिणती इंटेलिजन्स नाकाम ठरण्यात झाली.