लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली.

Latur : लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, मारहाण करणारे सुरज चव्हाण नेमके कोण आहेत? याबाबतची माहिता पाहुयात.
कोण आहे सूरज चव्हाण?
1) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सध्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
2) सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात.
3) एकत्रित राष्ट्रवादीत महाराष्ट्र युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सूरज चव्हाण यांनी पार पाडली आहे.
4) सूरज चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.
5)राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या 10 मध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज चव्हाण होते.
6) 2019 साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका सूरज चव्हाण यांनी बजावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमध्ये मोठा राडा झाला. विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना दादांच्या पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले, त्यानंतर कार्यकर्ते भिडले
सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत त्यांनी निवेदन दिलं. त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं. सूरज चव्हाण यांनी हाताच्या कोपराने, बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं दिसून येतंय.
सत्तेचा माज, हिशोब चुकता करणार
या मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेलो होतो. त्यांना घरी पाठवा असं सांगितलं. या नंतर आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये बसलो असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गुंड आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली. सत्तेचा माज काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला.
अजितदादा, आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. निवेदनाला जर तुम्ही लाथा बुक्क्यांनी प्रतिसाद देत असाल तर त्याचा हिशोब होणार. याचा राजकीय हिशोब तुम्हाला चुकवावा लागणार असा इशारा विजय घाटगे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
























