Konkan Shimga Utsav : कोकणात शिमगोत्सवाचा न्यारा रंग! उत्साह अन् जल्लोषात सण साजरा
कोकणात सध्या शिमगोत्सवाचा (Konkan Holi Dhulivandan Shimga Utsav ) फिवर चढला आहे. कोकणात कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर उठल्यानंतर शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.
Konkan Holi Dhulivandan Shimga Utsav : कोकणात सध्या शिमगोत्सवाचा फिवर चढला आहे. कोकणात कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर उठल्यानंतर शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. चाकरमानी देखील मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. कोकणातील प्रत्येक गावात होळीच्या काही रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात. शिवाय, काही ठिकाणी असलेल्या होळी आणि त्या ठिकाणचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो.
ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा
रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात दरवर्षी फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो. वर्षातून केवळ एकदाच रंगणाऱ्या आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक या पालखी भेटीच्या क्षणासाठी उपस्थित असतात. ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणून सोडणाऱ्या या सोहळ्याची रंगत अंगावर नक्कीच काटा आणते. पालखी भेटीच्या या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याने रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाची सुरवात होते.बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरीबुवा मंदिरा ऐटबाज पालखीत रुपं लावून बसवला जातो. त्यानंतर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला रंगतो तो दोन देवांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा. सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्या भैरी देवाच्या भेटीला येतात. देवळाच्या प्रांगणात या दोन पालख्या भेटीचा सोहळा रंगतो.
लांजा गावचे ग्रामदैवत चव्हाटाची होळी उत्सवाची परंपरा शेकडो वर्षांची
लांजा शहरात साजरी होणारी होळी देखील अशीच एक. यंदा मोठ्या उत्साहात होळी साजरी केली गेली असून हजारो भाविक याठिकाणी हजर होते. लांजा गावचे ग्रामदैवत चव्हाटाची होळी उत्सवाची परंपरा शेकडो वर्षांची आहे. या उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. लांजा शहरात 18 कुंभाचे मानकरी आहेत. कल्याण व कसबा असे दोन प्रांत पडले असून 18 मानकऱ्यांमुळे या ठिकाणी अठरा होळ्या उभ्या केल्या जातात. दरवर्षी या ग्रामदैवतांच्या या होळ्या नजीकच्या गावातून ढोल-ताशांच्या गजरात अस्सल कोकणी फाक्या घालत आणि देवतांचा जयघोष करत आणण्यात येतात. गुरुवारी ग्रामदैवत चव्हाटा आणि राम देवतांच्या होळ्या या जल्लोषी वातावरणात पारंपरिक पद्धतीने आणण्यात आल्या. या ग्रामदेवतांच्या होळ्या भाविकांच्या अपूर्व जल्लोषात आणि उत्साहामध्ये नाचण्यात आल्या. श्री रामाची होळी खेळवल्या नंतर श्री देव चव्हाटाची होळी मंदिर परिसरातून वाजत गाजत प्रदक्षिणा मारते.अतिशय पारंपारिक सोहळा पहाण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यावेळी पहायला मिळाली.
संबंधित बातम्या
Dhulivandan : आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; कुठलेही निर्बंध नाहीत पण...