(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला 'वर्षा'वर, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड
Jitendra Awhad Meet Eknath Shinde : शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महायुती सरकार पुन्हा आले. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची बदली मात्र झालं असून ते भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की झालं आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्ममंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले आहेत.
काय चर्चा हे मात्र अद्याप अस्पष्ट
या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
निधीच्या मागणीबद्दल भेट?
अजित पवार अर्थमंत्री असताना अनेकदा मागणी करूनही त्यांनी आपल्याला निधी दिला नव्हता अशी तक्रार या आधी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात त्यामुळे त्यांनी आपल्याला अनेकदा मदत केली होती असंही त्यांनी सांगितलं होतं. आताही महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रिपद हे अजित पवारांकडे जाणार हे निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्यालाही महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं लक्ष गुरुवारी अमित शाहांच्या घरी पार पडलेल्या बैठकीकडे होतं. देवेंद्र फडणवीसच नवे बॉस असतील असं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठोस सांगितलं जातंय. मात्र अद्याप महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक प्रलंबित आहे. ज्यात भाजप विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल.
महायुतीची बैठक सोडून एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी
अमित शाहांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर शुक्रवारी मुंबईत महायुतीची बैठक होणार असल्याचं स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र स्वतः एकनाथ शिंदेच साताऱ्यातील दरे गावाला जाणार असल्यानं ही बैठक लांबणीवर पडली आहे. दोन दिवसांनी म्हणजे शिंदे मुंबईत परतल्यानंतर ही बैठक होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. शिंदेंच्या दरे गावच्या दौऱ्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचा वेग काहीसा मंदावलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
नवीन मंत्रीमंडळात कुणाला किती मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
- भाजप - 20
- शिवसेना - 12 ते 13
- राष्ट्रवादी - 9 ते 10