(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार; अजित पवार समर्थक आक्रमक, पडळकर-राष्ट्रवादी वाद टोकाला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. आता त्याला अजित पवार समर्थकांकडून उत्तर देण्यात येतंय.
पुणे: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना 'लांडग्याचं पिल्लू' असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? असा प्रश्न विचारला असता पडळकर यांनी 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे' असं म्हटलं होतं.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 'जोडो मारो आंदोलन' करण्यात आलं.
'अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू'
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला. पण अजित पवारांचा उल्लेख त्यामध्ये नव्हता. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की, "आम्ही अजित पवारांना मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही. ते आता जरी आम्हच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत नाही."
आमदार गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: