Sanjay Raut ED : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स
Sanjay Raut ED : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स. चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश. पण अद्याप कोणतीही नोटीस आली नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut ED : राज्यातील राजकीय पेच सुटण्याची काही चिन्हं दिसेनात. शिवसेनेचे (Shiv Sena) प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळं शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता राज्यात खळबळ माजवणारी बातमी हाती आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
अद्याप ईडीकडून नोटीस मिळालेली नाही : संजय राऊत
आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
पीएमसी बँक घोटाळ्यातही आलं होतं नाव
2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुरु आशिष कंपनीचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून 2010 साली संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात आले होते. या पैशातून संजय राऊत यांनी मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश होता. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीनं यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. प्रवीण राऊत, सारंग वाधवान, एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन आणि इतरांची आरोपपत्रात नावं आहेत.
अशी कोणती वॉशिंग मशीन? इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली, अन् स्वच्छ झाली : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची थेट नावं घेत आरोप केले आहेत. यात सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. तो प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्याबाबत. संजय राऊत म्हणाले की, मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, सुप्रीम कोर्टात केस आहे, म्हणून आलोय. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, 'देवेंद्र फडवणीस मला भेटले इथं. ते मला अमित शाहांकडे घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लियर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, असं सरनाईकांनी मला सांगितलं. राऊत म्हणाले, अशी कोणती वॉशिंग मशीन होती की, इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली.', अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला होता.