(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार होताच दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट, मोठं कारण समोर
Dilip Walse Patil To Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना पाडा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटील आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. कोणतीही राजकीय चर्चा करण्यासाठी नव्हे तर ही भेट नियमित बैठकीसाठी आहे असं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी वळसे पाटील मुंबईत आले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं. त्यानंतर ही पहिलीच भेट असेल.
शरद पवार प्रमुख असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत बैठकर पर पडत आहे. दिलीप वळसे पाटील हे या संस्थेचे ट्रस्टी असून ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी शरद पवारांची ते भेट घेतील. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही, मात्र आपण शरद पवांरांची विचारपूस करू असं दिलीप वळसे पाटलांनी जाहीर केलं होतं.
विधानसभेला वळसेंना पाडा, पवारांचं आवाहन
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. यामुळे पवारांसह अनेकांना धक्का बसल्याची चर्चा होती. त्यानंतरच्या विधानसभेला दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगावातून शरद पवार गटाचे देवदत्त निकम निवडणुकीला उभे होते. त्यावेळी वळसे पाटील यांचा गद्दार असा उल्लेख करून त्यांना पाडा असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं.
वळसे पाटलांचा निसटता विजय
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांच्याविरोधात एक डमी उमेदवार उभा करण्यात आला होता. त्या अपक्ष उमेदवाराचे नावही देवदत्त शिवाजी निकम असंच होतं आणि त्यांना चिन्हही ट्रम्पेट हेच होतं. याच ट्रम्पेटमुळे लोकसभेला शरद पवारांच्या अनेक उमेदवारांची मतं कमी झाली होती. आंबेगावातही तेच घडल्याचं दिसून आलं.
डमी उमेदवार असलेल्या देवदत्त निकम यांच्या ट्रम्पेट चिन्हाला 2950 मतं मिळाली. त्यामुळेच दिलीप वळसे पाटील यांना 1100 मतांनी निसटता विजय मिळाल्याचं दिसून आलं.
विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असलेले हे नेते आता भेटीमध्ये काय चर्चा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा: