एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला, मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांमध्ये बंद दाराआड चर्चा
CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीदरम्यान त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहितीही समोर आलीय.
Lok Sabha Election 2024 : विदर्भातील पहिला टप्प्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी येत्या 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्र्यांनी विदर्भात प्रचार, सभांचा धडाका लावला आहे. या प्रचारादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीदरम्यान त्यांच्यात काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. महायुतीचे स्टार प्रचारक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे (Raju Parwe) यांच्या प्रचारसभेनिमित्य मुख्यमंत्री पारशिवनी येथे जात असताना त्यांनी आज ही भेट घेतली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा
रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपूरहून पारशिवनी कडे रवाना झालेय. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोराडी येथे असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतलीय. वरकरणी जरी ही भेट सदिच्छ असली तरी, या भेटीमागे मोठे राजकीय महत्व दडले आहे. महायुतीत रामटेकची जागा भाजपला सुटावी यासाठी भाजपने प्रचंड ताकद लावली होती. चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः या मतदारसंघातील रहिवासी असल्याने या मतदारसंघात भाजपला पोषक वातावरण असून प्रत्यक्षात भाजपचे मजबूत संघटन त्या ठिकाणी असल्याचा दावा भाजपने यापूर्वी केलाय.
त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह अनेकांचा होता. मात्र, जागावाटपामध्ये अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यात पडली. त्यामुळे शिवसेनेला जर ही जागा जिंकून घ्यायची असेल तर भाजपच्या संघटनात्मक मजबुतीचा वापर करून घेणे शिवसेनेच्या विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. परिणामी, त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री आपल्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. महायुतीतील मित्र पक्षाना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपच्या ताकतीला कुठेही कमी न लेखता त्यांना विश्वासात घेऊन आगामी निवडणूक लढण्याचा संदेशही या भेटीतनं मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
विदर्भातील वातावरण हे महायुतीमय झालंय - मुख्यमंत्री
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माझे मित्र आणि सहकारी आहेत. ते स्वतः विदर्भात प्रचार करत आहेत. त्यामुळे विदर्भातील वातावरण हे महायुतीमय झालेले आहे. आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीतील सर्व उमेदवारांचा मोठा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनानंतर मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलंय.
गेली 50-60 वर्षे ज्यांनी सत्ता भोगली, त्यांना जे त्यांच्या सत्तेच्या काळात करता आलं नाही ते पंतप्रधानांनी अवघ्या दहा वर्षात करून दाखवले आहे. त्यांच्याच नेतृत्वात आज राज्यात देखील डबल इंजिन सरकार जलद गतीने काम करत आहे. पावणे दोन वर्षात महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जे सर्वसामान्य नागरिकांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्या लोककल्याणकारी निर्णयांची पोचपावती आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आपल्याला दिसेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या