Chhagan Bhujbal : बॅनरवर फोटो नसला म्हणजे काय झालं? लाखो गरिबांच्या हृदयात माझा फोटो : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal On Ajit Pawar : आता म्हणतात की ज्येष्ठांना केंद्रात पाठवणार, मग विधानसभेला उभंच कशाला केलं असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी अजित पवारांना केला.
मुंबई : आपल्याला मंत्रिमंडळातून डावलल्यामागे काहीतरी मोठं गौडबंगाल असल्याचं मत ओबीसी नेत्यांनी बोलून दाखवलं असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जरी त्यांच्या बॅनरवर आपला फोटो लावला नाही तरी लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणं ही बाब पुरेशी आहे असंही भुजबळ म्हणाले. प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली. पण या बॅनरवर छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना मात्र बॅनरवर स्थान देण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देतना भुजबळ म्हणाले की, लाखो गरिबांच्या हृदयात आपला फोटो असणे ही बाब माझ्यासाठी पुरेशी आहे.
ओबीसी नेत्यांनी घेतली भुजबळांची भेट
महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर आता ओबीसी नेते एकत्र आलेत. ओबीसी नेत्यांसोबत छगन भुजबळांची जवळपास एक तास चर्चा झाली. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या भुजबळांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं.
छगन भुजबळ म्हणाले की, मला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचं मत ओबीसी नेत्यांचं झालं आहे. ओबीसी समाजातील विविध नेत्यांनी भेट आपली भेट घेतली आणि त्यांनी आपल्यासोबत असल्याचं सांगितलं. तुम्ही बाहेर असल्याने आम्ही त्रस्त असल्याचंही ते म्हणाले.
राज्यसभेत पाठवलं नाही
छगन भुजबळ म्हणाले की, "मी लोकसभेची तयारी केली होती. पण त्यावेळी मला थांबवण्यात आलं. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. पण त्यावेळीही मला तुमची राज्यात गरज आहे असं सांगत थांबवण्यात आलं. मग आता गरज संपली का? मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा सिनिअर लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. आधीच सांगायचं ना विधानसभेला उभे राहू नका म्हणून."
ज्येष्ठांना केंद्रात संधी दिली जाईल असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यसभेवर जा म्हणणे म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मग उभे केलंच कशाला?
छगन भुजबळ म्हणाले की, "मी ओबीसींसाठी लढणारा नेता आहे. 35 वर्षे ओबीसींसाठी लढतोय. मराठा समाजाचा द्वेष करत नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. मी मराठा समाजाचा विरोधक नाही. पण तसं चित्र निर्माण केलं गेलं. ओबीसींसाठी लढताना कुठल्याही इतर समाजाच्या हक्कांवर गदा आणू दिली नाही."
ही बातमी वाचा: