पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल; गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका
Gopichand Padalkar : जवळच्या लोकांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी शरद पवारांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
सोलापूर: पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा घराणेशाहीला वैतागून लोकांनी उद्रेक केला तर तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणच्या मुद्यावर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर आगपाखड केली.
ओबीसी आरक्षणाची हत्या पवार यांनीच केली, आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरु असून त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "पवार घराण्याला महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही त्या संस्कृतीचे राहीलेले नाहीत. पवारांनी संस्कार व संस्कृती वर बोलू नये जर महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. तुमच्याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील."
काँग्रेसवर टीका करताना आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, "काँग्रेस ही फक्त वसुली करण्यात मशगुल आहेत. इकडे ओबीसी आरक्षण गेले असताना तिकडे त्याचे मंत्री फॉरेनला गेले आहेत. काँग्रेसची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा येथे राज गादी मिळाली आहे, झोपायला बंगले मिळाले आहेत."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणाविषयी काही देणे घेणे नाही असे म्हणत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या :
- बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय ; पडळकरांची शरद पवारांवर टीका
- 'शकुनी काकांचा दोन हजार कोटीची एसटी बँक अन् मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव', पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप
- पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल; गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका