अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
BJP NCP Alliance : काही आठवड्यांपूर्वी आरएसएस मॅगझिन ऑर्गनायझरने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वर्णन अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी रिॲलिटी चेक असे केले होते.
BJP NCP Alliance : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित एनडीएला हवं तसं यश मिळालं नाही. भाजपच्या या पिछेहाटीला अजित पवार यांच्यासोबत केलेली युती कारणीभूत असल्याचं साप्ताहिक विवेकमधून एकप्रकारे सांगण्यात आलेय. साप्ताहिक विवेक हे आरएसएस (Rashtriya Swayamsevak Sangh) शी संबधित आहे. त्यामुळे या साप्ताहिकाच्या मार्फत संघाला आरसा दाखवल्याचं म्हटले जातेय. काही आठवड्यांपूर्वी आरएसएस मॅगझिन ऑर्गनायझरने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वर्णन अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी रिॲलिटी चेक असे केले होते. आता साप्ताहिक विवेकमधून लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केलेय. शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचेही सांगण्यात आलेय.
साप्ताहिक विवेकमध्ये काय म्हटलेय ?
लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या.
हे फक्त हिमनगाचे टोक -
हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे, आशी टीका साप्ताहिक विवेकमध्ये करण्यात आली.
भाजपा ’वॉशिंग मशीन’ -
लेखात आधी उल्लेखिल्याप्रमाणे भाजपामधील कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मीळ होत जाईल की काय, अशी एक प्रकारची भीती वा शंका कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली आहे. याला काही प्रमाणात हिंदुत्वविरोधकांनी सोशल मीडियावरून यशस्वीपणे चालवलेला नॅरेटिव्ह हेही एक कारण आहे. जसे की भाजपा हा आयातांचा पक्ष बनत चालला आहे, भाजपा ’वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला; परंतु दुसरीकडे सोशल मीडियावरून हिंदुत्वाची बाजू मांडणार्या ज्येष्ठ मंडळींबाबतीत जो प्रकार काही व्यक्तींनी अगदी अलीकडे केला त्यामुळे चुटकीसरशी या अस्वस्थतेला बळ मिळाले आणि गावागावांत चुकीचा संदेश गेला हेही खरेच, असे साप्ताहिक विवेकमध्ये म्हटले आहे.