(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari : अमोल मिटकरी यांचे मुख्य प्रवक्तेपद सहाच महिन्यात काढून घेतलं, उमेश पाटील अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. आधी ही जबाबदारी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे होती.
मुंबई: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना त्यांच्या पक्षानं दणका दिला आहे. त्यांचं मुख्य प्रवक्तेपद सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत. आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
पक्षाच्या या निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला पक्षाने दणका वगैरे काही दिला नाही. मागच्या वेळी प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी आकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे अभिनंदन.
मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटलांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी या आधी कुणाचीच नियुक्ती नव्हती. हे पद स्वतंत्र पद आहे. या आधी नवाब मलिक हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. आता त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे ही जबाबदारी मला देण्यात आली आहे. मी 2012 पासून पक्षाच्या प्रवक्तेपदी काम करतोय. सात प्रवक्त्यांचा मुख्य प्रवक्ता म्हणून अजित पवार आणि सुनील तटकरेंनी ही जबाबदारी मला दिली आहे.
ही बातमी वाचा: