kolhapur : आंतरजातीय विवाह लावून देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या पुरोगामी कोल्हापूरच्या भूमीत 'लव्ह जिहाद' शब्दप्रयोग 'शोभा' देत नाही!
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून 18 दिवसांपासून पसार झालेल्या संशयित तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी संकेश्वरमधून ताब्यात घेतले. मात्र, हे प्रकरण 'लव्ह जिहाद' असल्याचा दावा करण्यात आला.
Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) शहरात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून 18 दिवसांपासून पसार झालेल्या संशयित तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी संकेश्वरमधून ताब्यात घेतले. मात्र, त्याच दिवशी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून तसेच नितेश राणे यांच्याकडून हे प्रकरण तथाकथित 'लव्ह जिहाद' (Love Jihad)असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, 'लव्ह जिहाद' सारख्या शब्दप्रयोगातून महाराष्ट्राला वैचारिक, पुरोगामी वारसा देणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मनाला हे अत्यंत वेदना देणारे होते. ज्या कोल्हापूर शहराला एकसंध ठेवण्यासाठी, लोकराजा राजर्षी शाहूंचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचले, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावून दिले, त्यांना आधार दिला, अशा सामाजिक व्यक्तीमत्वांसोबत एबीपी माझाने या विषयावर बोलून व्याप्ती समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे एकीकडे नितेश राणे कोल्हापूरमध्ये आंदोलन करत असतानाच त्या दोन पीडित कुटुंबांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना पत्र देत आमचा या आंदोलनाशी संबंध नाही. आम्हाला त्यामध्ये ओढू नका, असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे हे आंदोलन नेमके कशासाठी होते? हा प्रश्न अनुत्तरित राहतो किंवा यामध्ये नेमकी कोणती पायाभरणी केली जात आहे याचाही संशय येतो.
सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी, दलितमित्र व्यंकप्पा भोसले, मेघा पानसरे आणि उदय नारकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. मुलगी अल्पवयीन असल्याने नक्कीच मुलावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे. मात्र, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रकार वेदनादायी असल्याचे मत या सामाजिक जाणकारांनी व्यक्त केले. त्या अल्पवयीन मुलीची फसवणूक झाली असेल, आमिष दाखवण्यात आलं असेल, तर त्या अंतर्गत जे कायदे आहेत त्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी म्हणतात
'लव्ह जिहाद' या नावाने संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं हिंदुत्ववादी काही नेत्यांकडून सातत्याने एक प्रयत्न होताना दिसतो. अगदी अलीकडील उदाहरण पाहिलं, तर अमरावती आणि श्रीरामपूर या ठिकाणी अशा दोन घटना घडल्या. यामध्ये राणा दांपत्य अमरावतीकडे आणि इकडे नितेश राणे या दोघांनीही पोलिसांवर दबाव टाकून हे प्रकरण 'लव्ह जिहाद' आहे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करून, तशी कारवाई करण्याबाबत सुद्धा आदेश देण्याचा प्रयत्न करत होते, अर्थात काही दिवसांनी 'लव्ह जिहाद' नसल्याचं स्पष्ट झाले.
आता दुर्दैवी एक घटना कोल्हापुरात घडली. उपलब्ध माहितीनुसार असं लक्षात येतं की अर्थात 'लव्ह जिहाद' अस्तित्वात नाही. कुठल्याही न्यायालयाने या संदर्भामध्ये 'लव्ह जिहाद' निवाडा दिल्याचे उदाहरण संपूर्ण भारतात नाही. ही संकल्पनाच तशी फॅब्रिकेटेड आहे, जाणीवपूर्वक निर्माण केली आहे आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरायला लावणारी आहे. कोल्हापूरच्या घटनेच्या बाबतीत अल्पवयीन मुलीच्या संदर्भातील हे प्रकरण असल्याने तो गुन्हाही ठरू शकतो, पण हा गुन्हा त्या एका मुलाच्या संदर्भात होऊ शकेल. मुलीकडूनही गुप्त पद्धतीने माहिती काढून घेतली पाहिजे, दबाव टाकून केलं आहे का? धर्मांतर करण्याच्या हेतूने झालं आहे का? हे विश्वासात घेऊन माहिती घेतली, तर काही तथ्य हे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहत असतो, शाहू महाराजांची परंपरा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याची तिथे परंपरा आहे. आणि हे सगळे इतकं चांगलं वातावरण असताना अशा काही, तरी समाज विघातक 'लव्ह जिहाद' आजच्या घटना तिथे घडतील यावर माझा विश्वास नाही.
आपल्या देशामध्ये आंतरजातीय आणि अंतर धार्मिय विवाह होण्याची परंपरा आहे. मुस्लिम मुली सुद्धा आहेत त्यांनी धर्मांतर न करता आंतरधर्मीय विवाह केला. अनेक मुस्लिम मुलं आहेत त्यांनी हिंदू मुलींशी विवाह केला. परंतु, त्यांचे धर्मांतर केलं नाही. स्पेशल मॅरेज ॲक्ट प्रमाणे हे लग्न केलं. मोकळ्या मनाने स्वीकारलेल्या गोष्टी असतील, तर सहानुभूतीने विचार व्हायला पाहिजे. हे केलं नाही तर हे जातीयवादी, धर्मवादी, राजकारणाला इंधन पोहोचवल्यासारखं होणार आहे आणि मला विश्वास आहे कोल्हापूरचे जे लोक आहेत ते लोक सुद्धा अत्यंत सजग आहेत, समाजभान ठेवणारे आहेत. तेव्हा या विषयाला पुढे करून हिंदू मुस्लिम असं स्वरूप या विषयाला आणणार नाहीत असं मला विश्वास वाटतो.
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात अग्रभागी राहिलेल्या मेघा पानसरे म्हणतात..
कोल्हापूरमधील प्रकरणात त्या अल्पवयीन मुलीची फसवणूक झाली आहे, आमिष दाखवण्यात आलं आहे, असे आढळल्यास त्या अंतर्गत जे कायदे आहेत त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. मेघा पानसरे पुढे म्हणाल्या की, जर अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आलं असेल, तर 'पोक्सो' लावण्यात काहीच गैर नाही. ज्यानं हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु, अशा अनेक घटना समाजामध्ये घडत आहेत. आम्ही स्वतः 2005 पासून कोल्हापुरात 'आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र' चालवतो. या केंद्रामध्ये अशा असंख्य तरुण-तरुणी आमच्याकडे सल्ला घेण्यासाठी किंवा कायद्याची माहिती घेण्यासाठी येतात. मला आठवते की, हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्या विवाहाला झालेला विरोध लक्षात घेऊन आणि त्यांना कोणताही सामाजिक आधार त्या काळात मिळत नसल्याने तो देण्याच्या उद्देशाने आम्ही काॅॅम्रेड गोविंद पानसरेंच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र स्थापन केलं होतं. गेल्या अनेक वर्षांत अशा अनेक घटना आम्ही हाताळल्या आहेत. त्यामुळे अशी जर काही घटना घडली असेल तर त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती घेतली पाहिजे. कोणत्या परिस्थितीमध्ये हे अपहरण किंवा पलायन झालं आहे, त्या मुलीची भूमिका काय आहे. त्या मुलाचा उद्देश काय आहे याची माहिती घेऊन काही विधाने करावीत. अनेक घटनांमध्ये प्रौढ मुलीही असतात. मात्र, अशा प्रकरणांना धार्मिक रंग देणं चुकीचं आहे, असे वाटते. याची माहिती घेतल्याशिवाय अशी विधाने करू नयेत.
अलीकडे अमरावतीमध्येही असंच एक प्रकरण झालं होतं. त्यामध्येही खासदार नवनीत राणा यांनी असाच 'लव्ह जिहाद'चा आरोप केला होता. त्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात आला. परंतु, काही दिवसांनी त्या मुलीने स्पष्ट सांगितलं की असं काही घडलेलं नाही. त्यामुळे अनेकदा नंतर खरी वस्तुस्थिती समोर येते. धर्म पाहून विश्लेषण करणं चुकीचं गोष्ट आहे. कोल्हापूर शहराला पुरोगामी वारसा आहे. शाहू महाराजांनी स्वत: आंतरजातीय विवाह लावून दिले. कोल्हापूर शहरात आंतरधर्मीय विवाह केलेल्यांमध्ये दुसरी-तिसरी पिढी आहे. आम्ही आंतरधर्मीय विवाह केलेल्यांना आपले अनुभव सांगावेत यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. परस्परांच्या धर्मांचा आदर करून, मानवतेचं तत्त्व सांभाळून अनेक विवाहित कुटुंबे जगतात याची असंख्य उदाहरणं त्यांनी दिली होती. प्रत्यक्षात आजपर्यंत एकाही प्रकरणात आम्हाला 'लव्ह जिहाद' आढळला नाही. 'लव्ह जिहाद' ही संकल्पना धार्मिक राजकारण करण्यासाठी वापरली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करावा. या प्रकरणात असे काही आहे का? हे पहावे. आधीच आरोप करू नयेत.
उदय नारकर म्हणतात...
कोल्हापूरमध्ये जो काही प्रसंग घडला त्याला लव्ह जिहादचा रंग देणं हे अतिशय चुकीचं आहे. लव्ह जिहाद नावाची अशी कोणतीही गोष्ट नाही. कोणताही धर्म या पद्धतीने आपल्या अनुयायांना असे प्रकार करा असे सांगत नाही. ती धार्मिक गोष्ट नाही. अशा काही गोष्टी घडत असतील तर आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये त्या तपासल्या पाहिजेत. अल्पवयीन मुलींना कोणी फुस लावत असेल, तर तो तर संबंधित कायद्यामध्ये तरतुदी तरतूद वापरली पाहिजे, ती बरोबर आहे.
परंतु, एका धर्माच्या विरोधामध्ये उभारलेले ते (लव्ह जिहाद) शस्त्र आहे. अशा प्रकारची जी भूमिका मांडली जाते ही भूमिका अतिशय गैर आहे व दोन धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच अशी वक्तव्य केली जातात. अत्यंत चुकीचे असे आरोप केले जातात. ही पूर्णतः राजकीय भूमिका आहे आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू मुसलमानांमध्ये द्वेषपूर्ण वातावरण निर्माण व्हावं आणि त्यांच्यामध्ये मोठी फूट पडावी यासाठीच आरोप केले जातात. त्याचा परिणाम सामाजिक एकता भंग होण्यामध्ये होतो. त्यामधून देश कमजोर होतो तो ही गोष्ट या मंडळींना लक्षामध्ये येत नाही किंवा देश कमजोर व्हावा या उद्देशाने ते करतात. कारण देश कमजोर झाला की जनतेची लूट करायला हे लोक रिकामे होतात. जनता लव्ह जिहादसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. त्यावर ना मुस्लिमांचा विश्वास आहे ना हिंदूचा विश्वास आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे. अशातून जनतेत फुट पाडणं हे देशप्रेमाचं लक्षण नाही.
दलितमित्र व्यंकप्पा भोसले म्हणतात..
खरोखरंच लव्ह जिहादसारखे प्रकरण आहे का? याचा तपास करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार वाढत चालला आहे. जिहादच्या नावाखाली देशामध्ये गोंधळ निर्माण करण्याचे, देवाधर्माच्या नावाखाली अनेक गोष्टी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच धर्मियांनी चिंतन करून शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे आणि आम्ही आंतरधर्मीय विवाह करून देत होतो. त्यामुळे नको ते शब्द जोडल्यास वातावरण क्लुषित होऊन जातं. त्यामुळे फेरविचार करणे आवश्यक आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतरही कोल्हापुरात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आम्ही तो प्रकार होऊ दिला नाही. हा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या