Akshaya Tritiya Live Updates : आज अक्षय्य तृतीया सणाचा उत्साह, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Akshaya Tritiya Live Updates : आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया.
LIVE
Background
Akshaya Tritiya 2023 Live Updates : आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात. याच संदर्भात यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
अक्षय्य तृतीया 2023 पूजा मुहूर्त
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम आणि हयग्रीवाचा अवतार घेतला होता, असं म्हटलं आहे. या दिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.
पूजेचा एकूण कालावधी 4 तास 31 मिनिटे
तृतीया तिथी प्रारंभ - 22 एप्रिल 2023 सकाळी 07:49 पासून
तृतीया समाप्ती - 23 एप्रिल 2023 सकाळी 07:47 पर्यंत
अक्षय्य तृतीयेचं महत्त्व काय?
हिंदू आणि जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणताही विचार न करता कोणतंही नवीन काम सुरू केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी, लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादीसाठी हा शुभ दिवस मानला जातो. तसेच तुम्हाला आवडणारं कोणतंही काम तुम्ही मोकळेपणानेया दिवशी करू शकता, कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता.
अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व
अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.
Pandharpur : विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी
Pandharpur : पंढरीचा विठुराया हा दिनदलितांचा, गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या (Shri Vitthal Rukimini) दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं देखील मोठ्या संख्येनं भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
चांदवडच्या शिक्षकानं रेखाटलं हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सलोख्याचा संदेश देणारे चित्र
Akshaya Tritiya : अक्षय तृतीया आणि रमजान ईद एकाच दिवशी दोन्ही सण आले आहेत. या सण, उत्सवाच्या निमित्ताने हिंदू - मुस्लिम बांधवांमध्ये सलोख्याचा संदेश देणारे चित्र नाशिकच्या चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने रेखाटलं आहे. रामासोबत रहीम ईश्वर सोबत अल्ला अक्षय तृतीया-रमजान ईद असे फलक रेखाटत शुभेच्छा दिल्या.
Akshaya Tritiya : चिपळूणच्या भगवान परशुराम मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Akshaya Tritiya : कोकणच श्रध्दास्थान असलेले चिपळूणच्या भगवान परशुराम मंदीरात आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली आहे. आज अक्षय तृतीया याच दिवशी भगवान परशुरामांचा प्रकटदीन म्हणून साजरा केला जातो. आज दिवसभर इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.