Akola News : अकोल्यात मॉन्टोकार्लो कंपनीच्या वाहनांची तोडफोड; माजी सरपंचासह 21 जणांवर गुन्हे दाखल, 9 जण अटकेत
Maharashtra Akola News : अकोल्यात मॉन्टोकार्लो कंपनीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी माजी सरपंचासह 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 जण अटकेत आहेत.
Maharashtra Akola News : अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक येथे क्षुल्लक कारणामुळं झालेल्या वादातून तब्बल 10 ते 12 वाहानांची तोडफोड करण्यात आली. या घटनेत 4 जण जखमीही झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पातूर पोलीस स्थानकात सरपंचासह 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 9 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातल्या भंडारज बुद्रुक येथील माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या दुचाकीनं जात असताना त्यांचा अपघात झाला. दरम्यान, दीपक इंगळे यांच्या अपघाताची माहिती गावकऱ्यांना मिळताच 30 ते 40 युवकांनी हातात लोखंडी पाईप, काठ्या आणून कंपनीवर हल्लाबोल केला आहे. यात मॉन्टोकार्लो कंपनीच्या 10 ते 12 वाहनांच्या काचा फोडून कंपनीचे कृष्णा लोखंडे, संजयसिहं जुदागीर सिंह, रितुराज बाळकृष्ण, विनोद भारती यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या चौघांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, माजी सरपंचासह तब्बल 21 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
'या' लोकांवर गुन्हे दाखल
भंडारजचे माजी सरपंच दिपक इंगळे, गणेश भगत, सुरेश इंगळे, गौरव इंगळे, ऋषिकेश इंगळे, राहुल शेळके, श्रीकृष्ण इंगळे, दिशांत इंगळे, गुजचंद वानखडे, सम्राट तायडे, शिवसागर इंगळे, संतोष इंगळे, शुभम शिंगणे, येवलेश भोयर, गणेश मिसाळ, गौरव वाघ, गणेश राऊत, विजय भालेराव, संकेत मिसाळ, राहुल घुगे, राम भालेराव यांच्यावर 170/22 कलम 143, 147, 148, 324, 341, 299, 427, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 9 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मॉन्टोकार्लो कंपनीच्या सुरू असलेल्या मेळशी रस्त्याच कामामूळ भंडारज बुद्रुक हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. कारण, मॉन्टोकार्लो कंपनीचे कार्यलय भंडारज बुद्रुक येथे उभारण्यात आले आहे. या कंपनीची अनेक जड वाहनं या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता खराब झाल्यानं अनेक अपघात होत आहेत. कालही (रविवारी) अपघाताबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्याच्याकडून उद्धटपणे वागणूक देण्यात आली. मान्टोकार्लो कंपनीचे कर्मचारी नेहमी भंडारज गावकऱ्यांना नेहमी त्रास देतात. जड वाहनं भरधाव वेगाने चालवली जातात. यामुळे रस्ता खराब होऊन धुळीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पिकं खराब झाली असल्याचाही आरोप दीपक इंगळे यांनी केला आहे.