Akola : अकोल्याच्या माजी महापौरांसह कुटुंबियांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 6,650 पानांचं आरोपपत्र
Akola News Updates बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपाखाली सन 2019 मध्ये गावंडे कुटुंबाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.
Akola News Updates : अकोल्याच्या पहिल्या महापौर आणि भाजप नेत्या सुमन गावंडे यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुमन गावंडे यांच्यासह त्यांचे पती आणि सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे आणि तिन मुलांचाही आरोपपत्रात समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून तीन हजार 650 पानांचे आरोपपत्र आज शुक्रवारी न्यायालयात दाखल केले. बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपाखाली सन 2019 मध्ये गावंडे कुटुंबाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.
अकोला शहरातील कौलखेड भागातील रहिवासी तसेच पोलिस खात्यातून एपीआय पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्रीराम गावंडे यांच्यासह त्यांची पत्नी भाजपाच्या माजी महापौर सुमन गावंडे आणि त्यांच्या तीन मुलांविरुद्ध अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी 20 ऑक्टोबर 2019 रोजी गुन्हा दाखल केला. सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे यांच्या सेवेच्या कार्यकाळातील परीक्षण कालावधीत सुमारे एक कोटी 52 लाख 22 हजार 894 रुपयांची बेहीशेबी मालमत्ता गोळा केल्याचे एसीबीने केलेल्या तपासात समोर आलेत. ही टक्केवारी सुमारे 385.65 टक्के अधिक असल्याचे समोर आले होते. या दरम्यान परीक्षण कालावधीतील खर्च आणि उत्पन्न यामध्ये प्रचंड तफावत असल्याचेही एसीबीच्या तपासात समोर आले. गावंडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काल शुक्रवारी केले आरोपपत्र दाखल :
एसीबीने या गुन्ह्याचा तपास करून तीन हजार 650 पानांचे आरोपपत्र आज न्यायालयात दाखल केले आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे यांच्या सेवेच्या कार्यकाळातील परीक्षण कालावधीत सुमारे एक कोटी 52 लाख 22 हजार 894 रुपयांची बेहीशेबी मालमत्ता गोळा केल्याचे समोर आले आहे. असे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन :
महाराष्ट्र गवळी समाजाचे तत्कालीन अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याप्रकरणातील संशयीत आरोपी श्रीराम गावंडे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलैला मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय न्यायपीठाचे न्यायमूर्ती संजय कौल आणि न्या.एम.एम.सुंदरेश यांनी ट्रायल कोर्टाच्या शर्ती आणि समाधान अटींच्या अधिन जामीन अर्ज मंजूर केला जात असल्याचे आदेशात नमूद केले आहे. एका शैक्षणिक संस्थेच्या संदर्भात हुंडीवाले व गांवडे यांच्यात वाद झाल्यानंतर प्रकरण अकोला येथील धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी साठी न्यायप्रविष्ट होते.