Akola : अकोट बाजार समिती; पैशांचा अपहार प्रकरण, गुन्हे अन् सचिवाचा निर्दोषत्वासाठी टाहो
अकोट बाजार समितीतील सव्वाबारा लाखांच्या अपहार प्रकरणी सचिव-लेखापालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिव राजकुमार माळवे यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवत मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे.
अकोला : जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या सचिवांसह रोखपालावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. दैनंदिन जमा रकमेतील सव्वाबारा लाखांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अकोट शहर पोलिसांत हे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे आणि लेखापाल मंगेश बोंद्रे यांचा समावेश आहे. बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांची ओळख 'दबंग' आणि भ्रष्टाचाराविरोधात रोखठोक भूमिका घेणारा अधिकारी अशी आहे. बाजार समितीतील भ्रष्ट प्रवृत्तींना रोखल्यानेच आपल्याविरुद्ध हे कटकारस्थान रचून आपला मानसिक छळ चालविल्याचा गंभीर आरोप सचिव माळवेंनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अकोट बाजार समिती ही अकोला जिल्ह्यासह विदर्भातील एक नावाजलेली मोठी बाजार समिती. मात्र, 'शेतकऱ्यांची संस्था' असलेली ही बाजार समिती सध्या चर्चेत आली आहे ती एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे. अन याच प्रकरणावरून सध्या बाजार समितीतील वातावरण अन राजकारणही तापलं आहे. बाजार समितीत वर्ष 2019-20 या वर्षभरात दैनंदिन जमा पावती आणि रोख रक्कमेचा बाजार समितीच्या रोख पुस्तकात भरणाच केला गेला नाही.
बाजार समितीतील रोखपाल मंगेश बोंद्रे यांच्याकडे हे काम होतं. यात या वर्षभरात 12 लाख 24 हजार 482 रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे. संस्थेच्या वार्षिक अंकेक्षणात हा गंभीर प्रकार समोर आला. बोंद्रे यांनी हा सारा पैसा त्यांच्याकडे वळता केल्याचं समोर आलं होतं. या गंभीर प्रकारानंतर बाजार समितीत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरू झाली या पैशांच्या वसुलीची प्रक्रिया. या संपुर्ण रकमेवर 30 टक्के व्याज आकारात हा संपूर्ण पैसा लेखापाल बोंद्रेंकडून वसुल करण्यात आला. बाजार समितीने बोंद्रे यांच्याकडून व्याजासह 17 लाख 57 हजार 465 रुपये वसुल केलेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचाराच्या आरोपातील रक्कम ही पोलीस कारवाईआधीच बाजार समितीच्या खात्यात भरल्या गेली आहे.
तीन संचालकांनी केली पोलीस तक्रार
अकोट बाजार समितीतील राजकारणात दोन गट आहेत. एक गट आहे 'सहकार पॅनल'चा. तर दुसरा गट आहे हा 'शेतकरी पॅनल'चा. पाच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेंव्हा 'शेतकरी पॅनल'ला बहूमत मिळालं होतं. मात्र, पुढच्या काळात 'शेतकरी पॅनल'चे दोन सभापती आणि काही संचालक सचिव राजकुमार माळवे यांच्या पुढाकाराने अपात्र ठरलेत. यातूनच संचालक मंडळाची मुदत संपतांना 'सहकार पॅनल'चं बहूमत झालं अन बाजार समितीत 'सहकार पॅनल' सत्तेत आलं. या दोन्ही गटांत गेल्या पाच वर्षांत कायम कुरघोडीचं राजकारण चाललं आहे.
बाजार समितीत झालेल्या या अपहारातील परस्पर रक्कम वसुलीचा हा संपूर्ण प्रकार संचालक मंडळाला अंधारात ठेवून केला गेल्याचा आरोप 'शेतकरी पॅनल' गटाने केला. यासंदर्भात 'शेतकरी पॅनल'मधील अतुल म्हैसने, विलास साबळे आणि राजकुमार मंगळे या तीन संचालकांनी अकोट शहर पोलिसांत सचिव माळवे आणि लेखापाल बोंद्रे यांच्याविरोधात तक्रार केली. त्यांनी या पैशांच्या अपहारासह एकूण 30 लाखांच्या अपहाराची तक्रार अकोट शहर पोलिसांत केली.
अकोट शहर पोलिसांनी केलेत गुन्हे दाखल
तीन संचालकांच्या तक्रारीनंतर अकोट पोलिसांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मार्गदर्शन मागविलं होतं. पोलीस अधिक्षकांनी हे प्रकरण मार्गदर्शनासाठी पुढे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. त्यांच्या अभिप्रायानंतर अकोट शहर पोलिसांनी सचिव राजकुमार माळवे आणि लेखापाल मंगेश बोंद्रे यांच्यावर 20 जूनला फसवणुकीचे गुन्हा दाखल केले होते. सध्या या प्रकरणात सचिव माळवेंना अकोट न्यायालयाने 20 जुलैपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तर लेखापाल बोंद्रे अद्यापही फरार आहे.
लेखापाल मंगेश बोंद्रेचं घुमजाव
बाजार समितीतील पैशांचा अपहार समोर आल्यावर आधी लेखापाल मंगेश बोंद्रे यांनी बाजार समितीकडे अपहाराची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली. यानंतर बोंद्रे यांनी अपहार झालेल्या रकमेवर जवळ तीस टक्के व्याज देत सदर रक्कम बाजार समितीला परत केली. नंतर बाजार समितीने बोंद्रला निलंबित केलं. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगेश बोंद्रे यांनी आपली भूमिका बदलली. पोलीस जबाबात आपण सचिव राजकुमार माळवे यांच्यासह या प्रकारात सहभागी असल्याचं सांगितलं. आधी आपल्या चुकीची लेखी कबुली देणारा लेखापाल बोंद्रे पोलीस जबाबात का बदलला? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल.
मी पुर्णत: निर्दोष, कोणत्याही निरपेक्ष यंत्रणेच्या चौकशीला तयार: सचिव राजकुमार माळवे
बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांची ओळख ही 'दबंग अधिकारी' अशी आहे. आपल्या कामामुळेच आपल्याला या प्रकरणात गोवत भ्रष्ट प्रवृत्तींनी आपला मानसिक छळ चालविल्याचा आरोप माळवेंनी केला आहे. आपल्यावरच्या भ्रष्टाचाराचे आरोप सचिव माळवे यांनी पुर्णपणे फेटाळून लावले आहेत. यासाठी बाजार समितीच्या अंकेक्षण अहवालात या अपहारासाठी लेखापालाला दोषी धरण्यात आल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. तर यात फक्त दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत अंकेक्षण अहवालात आपण यात कुठेही दोषी नसल्याचं स्पष्ट करीत माळवे यांनी निर्दोषत्वाचा दावा केला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या आईचा याच धसक्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माळवे यांनी केला आहे.
राजकुमार माळवे यांची बाजार समितीतील आतापर्यंतची 'विशेष' कामगिरी :
- राजकुमार माळवे गेल्या नऊ वर्षांपासून अकोट बाजार समितीचे सचिव. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून झाली होती नियुक्ती.
- 2015 मध्ये बाजार समितीतील विकासकामांत झालेल्या 1.44 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचा पुतण्या हरीश खडसे आणि
- तत्कालीन सभापती रमेश हिंगणकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणात पुढाकार.
- गेल्या सहा वर्षांत सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा बडगा उगारत बाजार समितीचे तीन सभापती आणि आठ संचालकांना अपात्र करण्यासंदर्भात पुढाकार.
- 2020 मध्ये बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाचा आरोप असलेल्या डॉ. प्रविण लोखंडे या जिल्हा उपनिबंधकांना सचिव माळवेंच्या तक्रारीवरून अटक.
- अकोट बाजार समितीत चार वर्षांपूर्वी कॅशलेस व्यवहार सुरु करून राज्यातील पहिली ऑनलाईन बाजार समिती बनविण्यासाठी पुढाकार.
- बाजार समितीची नफ्याची जमा शुल्क रक्कम गेल्या नऊ वर्षात जवळपास वीस कोटींवर गेली आहे.
माळवेंच्या विरोधातील सर्व शक्ती एकवटल्यात का?
या संपूर्ण प्रकरणात काही बाह्य घटकांच्या सहभागाची मोठी चर्चा अकोट तालुक्यात आहे. माळवेंचे काम आणि कारभाराने दुखावलेली सर्वच मंडळी या प्रकरणाच्या निमित्ताने एकत्र आल्याची चर्चा आहे. हेच लोक काही राजकारणी आणि पोलिसांच्या संगनमताने या प्रकरणात अधिक रस घेत असल्याचं बोललं जातं आहे. दुर्दैवाने हे खरं असेल तर हे सर्व लोक असेच शेतकरी हितासाठी असेच एकत्र का येत नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही', असं म्हटलं गेलं आहे. या प्रकरणातील नेमकं सत्य शोधत शेतकऱ्यांच्या या संस्थेवरचं हे अविश्वासाचं मळभ दूर करण्याचं काम पोलिसांना करावं लागणार आहे. मात्र, पोलीस यंत्रणेनंही हे करतांना कुणाच्या हातचं बाहुलं न बनता 'दूध का दूध, पाणी का पाणी' करत सत्य समोर आणावं ही माफक अपेक्षा लोकांमधून व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- शहरी नक्षलवाद प्रकरण : सुधा भारद्वाज आणि अन्य आरोपींचा दावा तथ्यहिन, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका
- Navi Mumbai Metro : मेट्रो रेल्वेच्या परिचालन आणि देखभालीकरिता महामेट्रोला स्वीकारपत्र; लवकरच करारनामाही केला जाणार
- Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल