अकोला जिल्हा परिषद निकालांमध्ये वंचितची 'बाजी', जिल्हा परिषदेत 'त्रिशंकू' स्थिती
अकोला जिल्हा परिषदेचे निकाल आज प्रचंड धक्कादायक लागलेत. सर्वाधिक सहा जागा जिंकलेल्या वंचितचंही आधीपेक्षा दोन जागांचं नुकसान झालं आहे
अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज लागलेत. या निकालात सर्वाधिक सहा जागा जिंकत वंचित बहुजन आघाडीनं बाजी मारली आहे. मात्र, निर्भेळ सत्तेसाठीचा 27 हा 'मॅजिक फिगर' वंचितला गाठता आला नाही. या निवडणुकीत जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रेंचं गाव असलेल्या कुरणखेड गटात वंचितचा उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या कुटासा गटात बच्चू कडूंच्या प्रहारचा उमेदवार विजयी झाला आहे. तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर यांचा सख्खा पुतण्या त्यांचा गृहमतदारसंघ असलेल्या शिर्ला मतदारसंघातून पराभूत झाला आहे.
जागा कमी होऊन वंचित जिल्हा परिषदेत सर्वात 'मोठा' पक्ष :
अकोला जिल्हा परिषदेचे निकाल आज प्रचंड धक्कादायक लागलेत. सर्वाधिक सहा जागा जिंकलेल्या वंचितचंही आधीपेक्षा दोन जागांचं नुकसान झालं आहे. 14 पैकी अपात्र ठरलेल्या सदस्यांमध्ये दोन सहयोगी अपक्षांसह आठ सदस्य हे वंचितचे होते. मात्र, कानशिवणी मतदारसंघ राष्ट्रवादीनं वंचितकडून खेचून आणत आपला एक सदस्य वाढविला आहे. यासोबतच पक्षाने उमेदवारी नाकारल्याने तेल्हारा तालूक्यातील अडगाव बुझरूक मतदारसंघातून सदस्यत्व रद्द झालेल्या प्रमोदीन कोल्हे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. पक्षाने येथून पक्षाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. प्रमोदीन कोल्हे यांनी येथून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून विजय मिळवला आहे. या सहा जागानंतर जिल्हा परिषदेत आता वंचितचे 22 सदस्य आहेत. एक संलग्न अपक्षासह जिल्हा परिषदेत वंचितचे आता 23 सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी वंचितला आणखी चार सदस्यांची आवश्यकता आहे.
भाजपचा करिश्मा घटला. संजय धोत्रेंच्याच मतदारसंघात भाजप पराभूत :
जिल्हा परिषदेत भाजपचे सात सदस्य होते. यातील तीन सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. यात मुर्तिजापूर तालूक्यातील बपोरी, अकोटमधील कुटासा आणि अकोला तालूक्यातील घुसर मतदारसंघाचा समावेश होता. मात्र, यात फक्त बपोरीमधून भाजपच्या माया कावरे विजयी होऊ शकल्या आहेत. भाजपला कुटासा आणि घुसर मतदारसंघ गमवावे लागलेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे भाजप खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर याचं पळसोबडे गाव असलेल्या कुरणखेड गटात वंचितचा उमेदवार विजयी झाला आहे. कुरणखेड जिल्हा परिषद मतदारसंघातून वंचितचे सुशांत बोर्डे विजयी झाले आहेत. तर याच जिल्हा परिषद गटातील पळसोबडे या गणातून वंचितच्या शोभा नागे विजयी झाल्या आहेत. अतिशय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात भाजपला पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला आहे. संजय धोत्रे यांच्यानंतर जिल्हा भाजपचं नेतृत्व करू पाहणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांच्यासाठी हे निकाल धोक्याची घंटा आहेत.
कुटासा मतदारसंघात आमदार अमोल मिटकरींवर बच्चू कडूंचा 'प्रहार' :
जिल्ह्यातील कुटासा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा गृहमतदारसंघ. राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीत हा मतदारसंघ मिटकरींनी राष्ट्रवादीसाठी आग्रहपूर्वक मागून घेतला होता. आमदार मिटकरींनी कुटासा मतदारसंघातून आपले स्विय सहाय्यक श्याम राऊत यांच्या आई छबूताई राऊत यांना उमेदवारी दिली होती. मिटकरींच्या राष्ट्रवादीविरोधात येथे भाजप, वंचित, काँग्रेस आणि प्रहारचे उमेदवार स्वबळावर उभे होते. ऐन मतदानाच्या दिवशी आमदार मिटकरींनी या मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी बच्चू कडूंनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. या महाभारतानंतर बच्चू कडूंच्या 'प्रहार' पक्षानं कुटासा मतदारसंघ जिंकत जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार एंट्री केली आहे. कुटासा मतदारसंघातून प्रहारच्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्यात. त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा पराभव केला.
अकोलखेड पंचायत समितीत 'ईश्वरचिठ्ठी' :
अकोट तालूक्यातील अकोलखेड पंचायत समितीचा निकाल 'ईश्वरचिठ्ठी'ने लागला. येथे शिवसेनेचे उमेदवार सुरज गणभोज यांना 1530 मतं मिळालीत. तर काँग्रेसच्या दिगंबर पिंप्राळे यांनाही 1530 मतं मिळालीत. अखेर ईश्वरचिठ्ठीत सेनेचे सुरज गणभोज विजयी झालेत.
पंचायत समिती निकालात वंचितची सरशी :
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 28 जागांपैकी वंचितनं 16 जागा जिंकत बाजी मारली आहे. या निवडणुकीत वंचितच्या पाच जागा वाढल्यात. तब्बल पाच पंचायत समित्यांवर वंचितची सत्ता अबाधित राहणार आहे. पंचायत समित्यांमध्ये शिवसेना पाच, भाजप तीन आणि काँग्रेस, प्रहार, एमआयएम आणि वंचितनं प्रत्येकी एक जागा जिंकली.
काय असतील संभाव्य सत्ता समीकरणे :
मागच्यावेळी फक्त 25 सदस्य असतांनाही ऐनवेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने सभागृहातून वॉकआऊट केलं. यावेळी भाजपनं अशी भूमिका घेतली नाही तर वंचित ऐनवेळी काँग्रेसकडे मदतीचा हात पुढे करू शकते. आज 'माझा'च्या चर्चेत काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी वंचितसमोर मैत्रीचा हात केलाये. वंचितनं यासंदर्भात थेट चर्चा करण्याचं आवाहन काँग्रेसला केलंये.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरचं पक्षीय बलाबल :
जागा : 39
वंचित बहूजन आघाडी : 16
शिवसेना : 12
भाजप : 04
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 02
अपक्ष : 02
आज कोणत्या पक्षानं जिल्हा परिषदेच्या किती जागा जिंकल्या?
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01
अकोला जिल्हा परिषदेतील आजच्या पोटनिवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 53
वंचित बहूजन आघाडी : 22
शिवसेना : 13
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
वंचित समर्थित अपक्ष : 01
अपक्ष : 03
पंचायत समिती :
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 28
जाहीर झालेल्या एकूण जागा : 28
वंचित : 16
शिवसेना : 05
भाजप : 03
काँग्रेस : 01
एमआयएम : 01
प्रहार : 01
अपक्ष : 01