Ajit Pawar : आम्ही फक्त 'या' कारणासाठी सत्तेत सामील झालो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar on Shinde-Fadnavis Govt : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार स्थापन केलं. आता अजित पवार यांनी त्यामागचं कारण स्पष्ट करत सांगितलं आहे.
Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा राजकीय भूकंप घडवत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. गडचिरोलीमधील एका शासकीय कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार स्थापन केलं. आता अजित पवार यांनी त्यामागचं कारण स्पष्ट करत सांगितलं आहे की, आम्ही जनतेच्या विकासासाठी हे केलं आहे.
अजित पवारांनी सांगितलं सत्तेत सामील होण्याचं कारण
अजित पवार यांनी सत्तेत सामील होण्यामागचं कारण सांगताना म्हटलं आहे की, ''सरकारमधील महत्वाचे, वरिष्ठ नेते गडचिरोलीची जबाबदारी घेत आहे. आधी आर. आर. पाटील, नंतर एकनाथ शिंदे आणि आता फडणवीस पालकमंत्री आहेत. उद्दिष्ट एवढेच आहे की, येथील विकास होऊन नक्षलवाद नाहीसा झाला पाहिजे. भाजप, शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झालं आहे. फक्त विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. कोणी काहीही बोलत असेल तरी आम्ही विकासासाठी आलो आहोत.''
'महायुतीतील कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या काम करा'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याचा आवाहन केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, ''माझे भाजपचे कार्यकर्ते, माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, या सर्वांनी एकत्रितरित्या काम करावं. सरकार जनतेसाठी असतं, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या हेच महायुतीचं उद्दिष्ट आहे.'' हा कानमंत्र अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
महायुतीकडून जनसामान्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
गडचिरोलीत विविध शासन योजनेअंतर्गत येथील हजारो लाभार्थ्यांना कोट्यवधींचा साहित्य लाभ म्हणून वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, सायकली, दिव्यांगांसाठी व्हील चेअर असं कोट्यवधी रुपयांचं साहित्य गडचिरोलीतील लाभार्थ्यांना वितरीत केलं जाणार आहे.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर
त्यशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभही हजारो लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. गडचिरोलीत शासन आपल्या दारी (Shashan Aplya Dari) या शासकीय कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. तिघांचे नागपूर वरून गडचिरोलीला हेलिकॉप्टरनं आगमन झालं.