Ajit Pawar on Jayant Patil : माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चिमटे काढताना ते करत असलेल्या शेरो शायरीचा सुद्धा उल्लेख केला.
Ajit Pawar on Jayant Patil : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज (5 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चिमटे काढताना ते करत असलेल्या शेरो शायरीचा सुद्धा उल्लेख केला. त्यामुळे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी सर्वाधिक टोमणे जयंत पाटील यांनाच दिले.
जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
मी दोन्ही बाजूने अर्थसंकल्प मांडला
जयंत पाटील यांनी अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केलं. मात्र हे करत असताना त्यांनी टोले सुद्धा लगावले. अजित पवार म्हणाले की जयंत पाटील यांनी नऊवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड केला त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. मात्र, कोणाच्या हाताखाली काम करत असताना काही सर्व काही ढकलावं लागतं. मोठी जबाबदारी आली की मुड बदलावा लागतो असे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांना टोला लागावला. त्याचबरोबर मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी एक बघितलं महाविकास आघाडी कडून अर्थसंकल्प मांडला की महायुतीने आरोप करायचे आणि आता महायुतीकडून मांडला तर महाविकास आघाडी आरोप करत आहे. तथापि, मी दोन्ही बाजूने अर्थसंकल्प मांडला हे खरं आहे.
राज्याची कोणीही बदनामी करू नये
दरम्यान, अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवार म्हणाले की राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक झाली असा समज जनतेत जाऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. चुकीचे आरोप करून राज्याची कोणीही बदनामी करू नये, अजित पवार म्हणाले. हे लोक म्हणतात प्रकल्प पळाले पळाले, सारखं गुजरातचं नाव घेतलं जातं. फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका. जयंत पाटील हल्ली खूप शायरी करू लागलेत, त्यामुळे मलाही त्यांना उत्तर द्यावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या