Nandurbar : स्थलांतर झाल्यानं नंदूरबार जिल्ह्यात मजुरांची टंचाई, शेतकरी हैराण, शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी मजुरांची शोधाशोध करत आहेत. मजुरांचे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. त्यामुळं मजुराची टंचाई भासत आहे.
Agriculture News in Nandurbar : यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं तयार झालेली पिकं काढणीला आली आहेत. या पिकांची काढणी करणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. कारण सध्या मजुरांची मोठी टंचाई भासत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात शेतकरी शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध करत आहेत. मजुरांचे मोठ्या प्रमाणावर जिह्यातून स्थलांतर झाले आहे.
नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस त्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे. त्यातच योग्य भाव मिळत नसल्यानं आणि वाढीव मजुरी देणं ही परवडत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.
आजूबाजूच्या परिसरातून मजूर आणले जातायेत
शेती कामासाठी आजूबाजूच्या परिसरातून मजूर आणावे लागत आहेत. त्यासाठी त्यांना वाहन करुन आणावे लागत आहे. वाहनाने आणण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत आहे. तसेच 200 ते 250 रुपये रोजंदारी दिल्यावरही मजूर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी आता मजूर टंचाईच्या संकटांनी त्रस्त झाला आहे.
शेती करावी असं वाटत नाही
शेतीत खर्च करुन हाती उत्पन्न येत नाही. उत्पन्न आलं तर चांगला पिकांना दर मिळत नाही. वेळेला मजूर मिळत नाहीत, त्यामुळं आता मला शेती करावी असं वाटत नसल्याचे शहादा तालुक्यातील शेतकरी एकनाथ पाटील यांनी सांगितले. एकनाथ पाटील यांच्याकडे 40 एकर शेती आहे. पण सध्या शेतीसाठी त्यांना मजूर भेटत नाहीत लांबून म्हणजे 20 किलोमीटरच्या अंतरावरुन आणावे लागत आहेत. त्यासाठी वाहनाचे भाडे द्यावे लागते. त्यामुळं शेती मोठी खर्चिक झाल्याचे एकनाथ पाटील म्हणाले. माझ्याकडे 38 एकर शेती आहे. यामध्ये कपाशी, सोयाबीन, मिरची, केळी अशी पिकं आहेत. सध्या मजुरांची मोठी टंचाई आहे. 120 रुपये मजुरी आहे. सध्या 200 रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याची माहिती शेतकरी राजकुमार जोहरे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: