Gopichand Padalkar : तत्कालिन जालना एसपी तुषार दोषींनंतर आता जिल्हाधिकारी सुद्धा रडारवर; गोपीचंद पडळकरांची थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार!
आंदोलने शांततेच्या मार्गानेच व्हावी ही धनगर समाजाची भूमिका आहे. परंतु, धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत जर काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत, असे पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई : जालन्यात (Jalna) अंतरवाली सराटीत मराठ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमारामुळे तत्कालिन एसपी तुषार दोषींचा मुद्दा अजूनही तापला असतानाच आता जालना जिल्हाधिकारी सुद्धा रडावर आले आहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता तत्कालिन एसपींची बदली चर्चेचा विषय झाला असतानाच आता जिल्हाधिकारी सुद्धा धनगर आरक्षणामुळे रडाररवर आले आहेत.
काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत
आंदोलने शांततेच्या मार्गानेच व्हावी ही धनगर समाजाची भूमिका आहे. परंतु, धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत जर काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत. यातून धनगर समाजाला चिथावून पुन्हा राज्य अस्थिर करण्याचे काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच आंदोलनातल्या 36 समाजबांधवांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आपण तात्काळ आदेश द्यावे, अशीही विनंती पडळकर यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी काय म्हटलं आहे तक्रारीत?
सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर धनगर आरक्षण प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राज्यभर 21 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आरक्षण अंमलबजावणीसाठीसाठी निवेदने दिली. संपूर्ण राज्यात शांततेत हा उपक्रम पार पडला. जालना जिल्हाधिकारी पांचाळ यांना निवदेन देण्यापूर्वी एक दिवस आधी माहिती देण्यात आली होती. त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारीही दर्शवली. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचं होतं. मात्र त्यांनी समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले म्हणूनच आम्हा धनगर योद्ध्यांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. यासाठी सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जावी.
गोपीचंद पडळकर यांनी गुन्हे दाखल करण्यावरून निषेध केला आहे. त्यानी म्हटले आहे की, मी व समाजातील जाणत्यांनी वातावरण चिघळू नये यासाठी प्रयत्न केले. परंतु, पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशाने 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील काही व्यक्ती धनगर समाजातील नाहीत, प्रत्यक्षदर्शी ओबीसी बांधवांवरही गुन्हे दाखल केले. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा आम्हा धनगर बांधवांवर असलेल्या आकसाचा मी जाहीर निषेध करतो.
इतर महत्वाच्या बातम्या