Amravati : करवाढ स्थगितीवरुन अमरावतीत श्रेयवादाची लढाई, निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांनी रणशिंगच फुंकले!
येणाऱ्या काही दिवसातच अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचा हा करवाढीचा निर्णय राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरला असता.
Amravati News: अमरावती महानगरपालिकेने (Amravati Updates) मालमत्ता करामध्ये 40 टक्के वाढ केल्यानंतर या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध झाला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मनापाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. नागरिकांमधील असंतोष बघता अखेर काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मालमत्ता कराच्या वाढीला तात्पुरती स्थगिती दिली. फडणवीसांच्या या निर्णयानंतर मात्र शहरात राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई दिसून येत आहे. मात्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत या मालमत्ता कर (Property Tax) वाढीला स्थगिती देऊन एकप्रकारे निवडणुकांचे रणशिंगच फुंकले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मालमत्ता कारवाढीला सर्वप्रथम काँग्रेसने विरोध केलं होता. त्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर मात्र काँग्रेसने जनआंदोलन छेडण्याची भूमिका घेतली. तेव्हा आयबी आणि इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होईल अशी माहिती राज्य सरकारला मिळाली आणि त्यांनी करवाढीला करण्यास स्थगिती दिली, असा अजब दावा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत (Bablu Shekhawat) यांनी केला आहे. असंच श्रेयवाद घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही दावा करण्यात आला आहे.
तर काँग्रेसवाल्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना पोरं होत नाहीत आणि दुसऱ्याच्या घरी पोरं झाली कि जल्लोष करायला ते सगळ्यात समोर असतात, अशा शब्दात भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी काँग्रेसच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. जनतेवरील मालमत्ता कराचा बोझा कमी करण्याचं संपूर्ण श्रेय हे भारतीय जनता पार्टीचं असल्याचे डॉ. बोंडे यांनी म्हटलं आहे.
राणा म्हणतात, सर्वप्रथम आम्ही विरोध केला
तर, महाविकास आघाडी सरकाराच्या कार्यकाळात मनपा प्रशासकांनी स्वतःहून करवाढीचा निर्णय घेऊन तो अमरावतीकर जनतेवर लादण्यात आला. या निर्णयाला सर्वात आधी विरोध आम्ही केला आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय चुकीचा ठरवत त्याला स्थगिती दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चोराच्या उलट्या बोंबा मारण्याची काही गरज नाही. या निर्णयाचे सर्व श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.
निवडणुकीमुळे करवाढ स्थगिती निर्णय
एकीकडे विरोधक या निर्णयाच्या विरोधात केवळ आंदोलन आणि निवेदन देऊन समाधान मानत होते तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी वाढीव मालमत्ता कराच्या निर्णयाला थेट स्थगिती देऊन षटकार मारल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. येणाऱ्या काही दिवसातच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचा हा करवाढीचा निर्णय राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरला असता, म्हणून या निर्णयाला सर्वांचा विरोध होत होता हे जरी सत्य असले तरी आता दिलेल्या या स्थगितीचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत या मालमत्ता करवाढीला स्थगिती देऊन एकप्रकारे निवडणुकांचे रणशिंगच फुंकले हे नक्की.
इतर महत्त्वाच्या बातम्या