Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषण 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याचा अंदाज
Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषण हे सध्याच्या 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत.
Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' (Aerosol) प्रदूषणाचे प्रमाण हे सध्याच्या 'धोकादायक' पातळीवरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कोलकाता (Kolkata) येथील बोस इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून हा इशारा देण्यात आला आहे. 'अ डीप इन्साइट इनटू स्टेट-लेव्हल एरोसोल पोल्यूशन इन इंडिया' हा ताजा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. अभ्यासात देशातील विविध राज्यांचे दीर्घकालीन कल (2005-2019), स्रोत विभागणी आणि भविष्यातील शक्यता मांडण्यात आल्या आहेत. यानुसार महाराष्ट्र सध्या 'धोकादायक' वर्गात असून यात एओडीचे (एरोसोल ऑप्टिकल डेप्थ) प्रमाण 0.4 ते 0.5 इतके आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ते 0.5 पातळीच्या पार जात अतिधोकादायक वर्गात जाण्याची शक्यता आहे.
प्रदूषणाच्या स्रोताचे मूल्यमापन 2005 ते 2009, 2010 ते 2014 आणि 2015 ते 2019 अशा तीन टप्प्यांवर करण्यात आले आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या उत्सर्जनाचा वाटा 2015 ते 2019 मध्ये 39 टक्के इतका होता. तर घनकचरा जाळण्याने होणारे एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण 24 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, तर वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण तीनही टप्प्यांमध्ये 14 ते 15 टक्के होते.
एरोसोल म्हणजे काय?
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते वातावरणातील विविध स्तरांमध्ये हवेत वितरीत झालेले धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ याची एकत्रित मोजमाप होते
वातावरणातील विविध लेअर्समध्ये मोजमाप झालेल्या पॅरामीटरला एरोसोल ऑप्टिकल डेप्थ म्हणजेच एओडी म्हणतात
सरळसरळ म्हणायचं तर एरोसोल म्हणजेच पीएम 2.5 ची मात्रा वातावरणात किती आहे हे यातून कळते
धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ हे श्वसनास हानिकारक असतात.
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली
दोन वर्षांनंतर देशभरात कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात आली. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. संपूर्ण पावसाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत होता. पण पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतषबाजीमुळे हवा गुणवत्ता खालावली. हवेची ढासळलेली गुणवत्ता लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक आहे.
इतर महत्त्वाची बातमी