महाराजांच्या पायाशी बसणाऱ्याला नोटीस? ही तर मोघलाई, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जर आमच्या देवतेकडे न्याय नाही मागायचा, तर कोणाकडे मागायचा', असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Aditya Thackeray on Shinde Fadnavis Government: शिवाजी महाराजांच्या पायाशी बसून उपोषण केल्यानंतर जर शिस्तभंगाची कारवाई होत असेल तर ते मुघलांच्या राज्यातच होऊ शकतं अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी आमदार नितीन देशमुख हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापुढे असं केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. नार्वेकरांच्या इशाऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.
एखाद्या मुघल राज्यात असं होऊ शकतं की, महाराजांच्या पायथ्याशी बसून जेव्हा आपण न्याय मागतो, त्यावेळी त्याला शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाते. जर आमच्या देवताकडे न्याय नाही मागायचा, तर कोणाकडे मागायचा'', असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी उपोषणाला बसले होते. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर देशमुख यांचे हे उपोषण सुरू आहे. यावरूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोमर बसून आंदोलन करू नये, तसेच आंदोलन करायचे असेलच तर विधानसभेच्या पायरीवर करावे, याबाबतच्या सूचनांचे त्यांनी पालन केले नाही, तर याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यावर टीका केली आहे.
Aditya Thackeray on Shinde Fadnavis Government: शिस्तभंगाच्या कारवाईवर काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, ''शंभूराज देसाई यांनी सभागृहात आता जी माहिती दिली (नितीन देशमुख यांच्या उपोषणाला संदर्भात), त्याच संदर्भात सकाळीही चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने मी निर्देश दिले की, शासनाने त्यांच्यासोबत बोलून त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या समजून त्यावर मार्ग काढावा. त्या अनुषंगाने शासना तर्फे शंभूराज देसाई हे त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं, काय वस्तुस्थिती आहे याबाबत मलाही अवगत केलं. या संदर्भात काही निवेदनं उपमुख्यमंत्र्यांकडे आली होती. त्या निवेदनांच्या आधारे उपमुख्यमंत्री यांनी स्थगिती दिली. मात्र ती कायम स्वरूपाची स्थगिती नव्हती. यात जी निवेदनं आली आहेत, त्यातील वस्तुस्थिती पाहून पुढेच आदेश ते देणार आहेत. याबाबत त्यांना (नितीन देशमुख) ही सांगण्यात आलं. असं असतानाही ते काही काळ पाऱ्यांकडे आले, नंतर पुन्हा पुतळ्याजवळ जाऊन बसले.''
नार्वेकर पुढे म्हणाले, ''मी त्यांना माझ्या दालनात बोलवलं होतं. मात्र ते आले नाही. मला हे सभागृहात सांगायचं नव्हतं, मात्र सभागृहापासून कोणतीही गोष्ट लपून ठेवण्याची माझी इच्छा नाही. म्हणून मी हे सांगत आहे.'' ते म्हणाले, ''आतापर्यंत आपल्या विधिमंडळाची जी परंपरा आहे, नियमात जरी लिहिलं नसेल. तरी परंपरेनुसार आपल्याला जर सभागृहाबाहेर विधानभवनाच्या आवारात कुठे आंदोलन करायचे असेल तर ते आपण पायऱ्यांवरती करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्याचे, देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे पुतळ्याखाली जाऊन राजकीय आंदोलनकरने हे मला योग्य वाटत नाही. अजूनही त्यांना आंदोलन करायचं असेल, त्यांचं समाधान झालं नसेल, तर त्यांनी पायऱ्यांवर येऊन आंदोलन करावं. ही त्यांची मर्जी आणि इच्छा आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून आंदोलन करण्याची प्रथा पाडणे योग्य नाही. त्यामुळे तशी समज मी त्यांना परत देईन आणि त्यातून त्यांनी योग्य कारवाई केली नाही, तर शिस्तभंगाची कारवाई असो की दुसरी कोणती कारवाई करण्याचा विचार करू.''