Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 23 फेब्रुवारी 2022 : बुधवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. रशियाविरोधात निर्बंध जाहीर करताना अमेरिकेकडून युक्रेनला कुमक पुरवण्याची तयारी, तर युक्रेनवर हल्ला करण्यास रशियन संसदेची पुतीन यांना मान्यता
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धजन्य स्थिती असताना आता अमेरिकेने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली आहे. यामुळे रशियाची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संकटाच्या मुद्यावर देशाला उद्देशून भाषण केले. बायडन यांनी म्हटले की, डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या प्रांतांची देश म्हणून घोषणा करणे, डोनबासमध्ये शांती सैन्य पाठवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात अमेरिका आर्थिक निर्बंध लागू करत आहे. या आर्थिक निर्बंधामुळे रशिया आता पाश्चिमात्य देशांसोबत व्यापार करू शकत नाही असेही बायडन यांनी म्हटले.
2. रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य स्थितीचे जगभरात पडसाद, कच्च्या तेलाच्या किमती गेल्या सात वर्षात उच्चांकी, खाद्यतेलही महागण्याची शक्यता
3. राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आजपासून दोन दिवस संप, संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, सरकारचं परिपत्रक
4. एसटीच्या शासकीय सेवेत विलीनीकरणाचा मुद्दा वगळता इतर सर्व मागण्या मान्य, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, संपाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी
वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारीही ठोस तोडगा निघालेला नाही. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीच्या अहवालासह त्यावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिप्राय सीलबंद लिफाफ्यात कोर्टापुढे सादर करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी नसल्यानं हा त्यांच्याच अभिप्राय आहे हे मानायचं कसं? असा सवाल उपस्थित करत त्याबाबत पुरावा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. तसेच हा गोपनीय अहवाल इतर प्रतिवाद्यांसह सार्वजनिक करायचा का?, यावरही खुलासा करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
5. मुंबई लोकलमधील प्रवासासाठी लससक्ती मागे घेण्याची राज्य सरकारची तयारी, हायकोर्टातही ग्वाही, 25 फेब्रुवारीला अंतिम निर्णय होणार
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 23 फेब्रुवारी 2022 : बुधवार
6. खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय, आनंदराव अडसूळांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी
7. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दूरवस्था, शेकडो दुर्मिळ पुस्तकांना वाळवी लागल्याचं उघड, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
8. शेगावच्या श्री गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन, राज्यभरातून शेगावात दिंड्या दाखल, कोरोना निर्बंध पाळत सोहळा संपन्न होणार
9. उत्तर प्रदेशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान, 59 जागांसाठी 624 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
10. उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी काडीमोड घेण्याच्या पवित्र्यात, सूत्रांची माहिती, पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यातही खलबतं