Aaditya Thackeray : दिल्लीच्या बहिणींना 2500, मग महाराष्ट्रातल्या बहिणींना 1500 का? भेदभाव का करताय? आदित्य ठाकरेंचा सवाल
Ladki Bahin Yojana :तानाजी सावंत यांच्यासारख्या घाणीवर मी बोलत नाही, त्यांनी भ्रष्टाचार करून खरेदी केलेल्या अँब्युलन्स खेकड्यांनी खाल्ल्या असतील असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुंबई : राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द फिरवला असून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपची सत्ता असलेल्या दिल्लीतील लाडक्या बहिणींना 2500 रुपये दिले जातात आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मात्र 1500 रुपये दिले जातात. महाराष्ट्रासोबत हा भेदभाव का केला जातोय असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्य सरकारकडून यावेळी 2100 रुपये देणे अपेक्षित होतं. पण तेही दिलं गेलं नाही. दुसरीकडे दिल्लीतील लाडक्या बहिणींना 2500 रुपये दिले जातात. मग राज्यात कमी रक्कम का दिली जाते? आम्ही सत्तेत आलो असतो तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते."
लाडकी बहीण योजनेचा निधी का कमी केला?
गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता त्यामध्ये घट करून 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा घाट असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या योजनेतून कुणालाही कमी न करता सर्वाना लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
अंब्युलन्स खेकड्यांनी खाल्ल्या असतील
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील 35 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी करण्यात आल्या, त्या शववाहिका धूळ खात पडून असून त्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आदित्य ठाकरेंना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, मी काही ठराविक घाणींवर बोलत नाही. त्या अँब्युलन्स खेकड्यांनी खाल्ल्या असतील.
साताऱ्यात नवीन महाबळेश्वर कशासाठी आणि कोणासाठी निर्माण केलं जात आहे? या ठिकाणी कोणी जागा घेऊन ठेवल्या आहेत? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. राज्यात आनंदाचा शिधा जसा बंद झाला तसाच शिंदे गटही बंद केला जात असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
नंतर ते शायनिंग मारायला आले
कांदिवलीमध्ये एका मराठी माणसाचे घर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने लुबाडल्याची घटना घडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करत मूळ मालकाला घर परत केलं. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, "हा मुद्दा आमच्या अखिल चित्रे यांनी पहिल्यांदा उचलला होता. त्या संबंधी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यावर कारवाई झाली आणि नंतर हे शायनिंग मारायला आले. आता त्या लालसिंग राजपुरोहितला किती दिवस ठेवतात ते पाहणं महत्वाचं."























