Konkan forest | कोकणातील जंगलात असलेल्या 'या' झाडाची किंमत आहे तब्बल 100 कोटी!
कोकणातील जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीनंतंर आता वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी झाडाला संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी : 100 कोटी! राज्यात आणि राज्याच्या राजकारणातील चर्चेत असलेला आकडा. 100 कोटी या आकड्यानं राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ देखील झाली. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या साऱ्या प्रकरणावर अद्याप देखील चर्चा सुरू आहे. हे सारं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. पण, एका झाडाची किंमत 100 कोटी असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण, होय कोकणच्या जंगलात तब्बल 150 वर्षे आयुष्यमान असलेल्या झाडाची किंमत आहे तब्बल 100 कोटी! होय, जाणकारांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील किंवा स्थानिक बाजारातील रक्त चंदनाला असलेली मागणी, त्याचा उपयोग पाहता या रक्त चंदनाच्या झाडाची किंमत तब्बल 50 ते 100 कोटीच्या घरात जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली या गावच्या देवराईमध्ये 150 वर्षे जुनं असलेलं झाड आहे. सध्या स्थानिक असोत किंवा वनविभाग या झाडावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, हे झाड नेमकं आलं कुठून हा प्रश्न अद्याप देखील अनुत्तरीत आहे.
कोकणात झाड आलं कुठून?
रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, संयुक्त अमिरात इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. त्यामुळे कोकणात हे झाड आलं कुठून? हा प्रश्न नक्कीच अनुत्तरीत आहे. याबाबत आम्ही गावातील काही स्थानिक आणि जाणकार व्यक्तिंशी बोलणं केलं. यावेळी बोलताना प्रकाश चाळके यांनी 'खरं सांगायचं झालं तर हे झाडं इथं आलं कुठून याची गावातील कुणालाही कल्पना नाही. साधारण 30 ते 40 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये कातभट्टी चालायच्या. त्यावेळी कातकरी समाज हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असे. त्यांचे बैल पातळ असं शेण टाकू लागल्यानंतर ते या झाडाची साल उगाळून त्यांना देत असत. त्यानंतर त्यांचे बैल ठणठणित होत असत. परिणामी हे झाड औषधी आहे हेच आम्हाला माहित होतं. काही वर्षांपूर्वी या ठिकाणची झाडं तोडली गेली होती. पण, औषधी आणि दुर्मिळ झाडं तोडायची नाहीत असा निर्णय एकमुखानं घेतला गेला. त्यामुळे हे झाड देखील वाचलं. त्यानंतर चार ते पाच वर्षापूर्वी अचानकपणे कुणीतरी यावर अभ्यास करत, याचा गर काढत हे झाड रक्तचंदन असल्याचं सांगितलं. पण, कुणी? हे मात्र आम्हाला माहिती नाही. हे झाड कुठून आलं हे सांगता येत नाही. पण, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांनी या 27 एकराच्या जागेवर हे लावलं असावा असा आम्हाला अंदाज आहे. अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली.
सुरक्षेसाठी गावचा, वनविभागाचा पुढाकार
दरम्यान, काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपासच्या परिसरात केली जाते. त्यामुळे आम्ही याबाबत वनविभागाशी देखील बोलणे केले. यावेळी एबीपी माझाशी बोलताना देवरूख वनविभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी 'सध्या झाडाच्या सुरक्षेसाठी आम्ही देखील ठराविक अंतरानंतर, वेळेनंतर या ठिकाणी गस्त घालत असतो. शिवाय, महसुल विभाग देखील यावर जातीनं लक्ष घालून असते. मुख्य बाब म्हणजे यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. त्यांच्याकडून देखील या झाडाच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला जात आहे. गावचे नागरिक देखील या झाडाच्या सुरक्षेसाठी जागृक असून त्यामुळे कोणताही समस्या येत नाही' अशी प्रतिक्रिया दिली.
100 कोटी हा आकडा नेमका आला कुठून?
अर्थात रक्त चंदनला बाजारात असलेली मागणी आणि दर पाहता याचा दर 100 कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. याबाबत आम्ही जाणकार, अभ्यासक असलेल्या संदिप कांबळे यांच्याशी संवाद साधला. संदिप कांबळे हे सेंद्रीय शेती आणि पर्यावरण तज्ञ्ज देखील आहेत. या झाडाच्या किंमतीबाबत बोलताना आम्ही कांबळे यांना या झाडाची किंमत नेमकी किती? असा सवाल केला. त्याला उत्तर देताना त्यांनी 'मुळात रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मिळ असल्याचं सांगितलं. बाजारात सध्या रक्तचंदनाला पाच ते सहा हजार रूपये प्रति किलो या दरानं विक्री होते. चीन असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. एक फुटाची मूर्ती देखील 4 ते 5 लाख रूपये दरानं विकली जाते. या झाडाचं आयुर्मान देखील जास्त आहे. शिवाय झाडाच्या लाकडाची घनता जास्त असल्यानं या झाडाचं लाकूड पाण्यावर तरंगत नाही तर ते बुडते. साधारण एक फुटाचं लाकूड जरी आपण घेतलं तरी त्याचं वजन मोठ्या प्रमाणात दिसून येतं. सध्या देवराईत असलेलं हे झाड तब्बल 150 वर्षे जुनं आहे. शिवाय, चंदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या ठराविक लाकडाचा उपयोग होतो असं नाही. त्यामुळे हे झाडं सहजपण 50 ते 100 कोटीच्या घरात आहे' अशी प्रतिक्रिया दिली.
रक्त चंदनाचा उपयोग आणखी कशाकरता होतो?
उच्च प्रतिची दारू, मूर्तीकलेचा वापर, तसेच आयुर्वेदामध्ये देखील याचा सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती जाणकार देतात.