Ajit Pawar VS Eknath Shinde : सासूसाठी वाटणी करून सासू वाटणीला आलेल्या सीएम एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात?
एकनाथ शिंदे यांनी शिरुरमध्ये शक्तीप्रदर्शन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला.
मुंबई : ज्या शिंदे गटातील नेत्यांकडून तत्कालिन महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधीवाटपावरून बेछूट आरोप केले होते तेच अजित पवार महायुतीमध्ये राष्ट्रवादी फोडून आले. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर अजित पवारांनी ताकदीच्या जोरावर अर्थमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांची भावना पुन्हा अडगळीत गेल्याची झाली आहे. आता यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar VS Eknath Shinde) यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवारांकडून चार लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. यानंतर पुन्हा एकदा दोन्ही गटात पडद्याआडून खणाखणी सुरु झाली आहे.
शिरुर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांकडून शक्तीप्रदर्शन
शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केला होता. मात्र, याच मतदारसंघात शनिवारी (6 जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. तसेच या मतदारसंघात जाहीर शक्तिप्रदर्शन केलं. शिरूरमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी बोलताना आढळराव पाटलांना संधी मिळेल अशा आशयाचे वक्तव्य केलं आहे. यानंतर अजित पवार यांनी सुद्धा थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेत अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. इतकंच नाही, तर ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या, असे आदेश दिले. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिरुरमध्ये शक्तीप्रदर्शन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (7 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्याना उद्देशून बोलता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा सुप्त संघर्ष सुरु आहे का?अशी चर्चा सुरू झाली आहे.
अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार
दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार गटात असलेल्या अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघावर दावा केला होता. तसेच कोल्हे यांना जाहीरपणे पाडणार असल्याचे सांगितले होते. एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या, असं अजित पवार म्हणाले होते.
उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं, पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, निवडून आणून दाखवणार, असंही अजित पवार म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या